मराठी नाटके आणि कादंबऱ्यांवर चित्रपट काढणे नवीन नाही. अगदी वि. स. खांडेकरांच्या कादंबऱ्यांपासून हा प्रवास सुरू झाला. मात्र, मधल्या काळात हा प्रवास काहीसा खंडित झाला होता. ‘नटरंग’ने त्याला पुन्हा सुरुवात करून दिली, तर ‘दुनियादारी’ने त्यावर कळस चढविला आहे. त्यामुळे मराठी नाटके आणि कादंबऱ्यांचा शोध सुरू झाला आहे. ज्येष्ठ लेखक आनंद यादव यांच्या ‘नटरंग’ या कादंबरीवर त्याच नावाचा चित्रपट आला. नाच्याच्या आयुष्याची कहाणी मांडलेल्या या चित्रपटातील अजय-अतुलचे संगीत प्रचंड गाजले. सोनाली कुलकर्णीला या चित्रपटानेच स्टारडम मिळवून दिला. मिलिंद बोकील यांच्या ‘शाळा’ या कादंबरीवरही याचा नावाचा चित्रपट बनला होता. तर, मराठी तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या ‘दुनियादारी’ या सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवरील चित्रपटाने मराठीत इतिहास रचला. तर, नुकताच आलेला ‘बायोस्कोप’ हा चित्रपट तर कवितांवर आधारित आहे. यामधील एक शॉर्टफिल्म विजय तेंडुलकर यांच्या ‘मित्राची गोष्ट’ या लघुकथेवर आधारित आहे. यापूर्वी विजय तेंडुलकर यांच्या कादंबऱ्यांवर आणि नायकांवर चित्रपट निघाले आहेत. ‘कमला’ या त्यांच्या कादंबरीवर शबाना आझमी आणि मार्क झुबेर अभिनित चित्रपट निघाला होता. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या ‘पार्टी’ नाटकावर विजया मेहता यांनी चित्रपटाची निर्मिती केली होती. जयवंत दळवी यांच्या ‘चक्र’ कादंबरीवरील चित्रपटाने खळबळ उडविली होती. स्मिता पाटील आणि नसिरुद्दीन शहा यांनी या चित्रपटात काम केले. मात्र, हे वेगळ्या स्वरूपाचे चित्रपट होते. मराठी चित्रपटांनी मात्र या प्रकारच्या साहित्याची वाट कधी चोखाळली नाही. कौटुंबिक कथाच मराठीला आपल्याशा वाटल्या. वसंत कानेटकर यांच्या ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकावर ‘आंसू बन गये फूल’ हा हिंदी चित्रपट बनला होता. य. गो. जोशी यांच्या ‘वहिनींच्या बांगड्या’वर चित्रपट बनला होता. अण्णा भाऊ साठे यांच्या ‘फकीरा’, ‘वारणेचा वाघ’ या कादंबऱ्यांवरही चित्रपट बनले. वि. स. खांडेकर यांच्या ‘छाया’ आणि ‘ज्वाला’ या कादंबऱ्यांवर चित्रपट बनले होते; परंतु, खांडेकरांनीच त्याची पटकथा लिहिली होती. श्री. ना. पेंडसे यांच्या ‘गारंबीचा बापू’ या कादंबरीवरही चित्रपट निघाला होता. काशिनाथ घाणेकर यांनी त्यामध्ये काम केले होते. हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे रंगभूमीवर गाजलेल्या तसेच अनेक पुरस्कार मिळविलेल्या ‘तरुण तुर्क, म्हातारे अर्क’बरोबरच ‘बंटी की बबली‘ आणि ‘लाली लीला’ या नाटकांवर आधारित मराठी चित्रपट येणार आहेत. लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम यांच्या ‘बंटी की बबली’ या नाटकात निर्मिती सावंत, मानसी कुलकर्णी या कलाकारांनी काम केले होते. याच नाटकावर चित्रपट काढण्याचे पेम यांनी ठरवले आहे. ‘कुणी तरी येणार येणार गं...’ असे तात्पुरते नाव या चित्रपटाला देण्यात आले आहे. आदिनाथ कोठारे, ऊर्मिला कानेटकर-कोठारे, आदींच्या भूमिका यात असतील. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. या चित्रपटानंतर लगेच ‘लाली लीला’ या नाटकावरही चित्रपट काढण्याचे पेम यांनी ठरवले आहे. त्यात माधवी जुवेकर, मधुगंधा कुलकर्णी या कलाकारांनी काम केले होते. मात्र, या चित्रपटात कोण काम करणार, हे अजून ठरलेले नाही.
मराठी नाटके, कादंबऱ्यांतून चित्रपटांना आशयघनता
By admin | Updated: July 27, 2015 02:14 IST