रिक्षावाला बनला लेखक,निर्माता अन् कोरियोग्राफर,पोटाला चिमटा काढत कलेसाठी स्वतःला घेतलं वाहून
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 11:10 IST
कलेवर एखाद्याची निष्ठा,प्रेम असेल तर त्या कलेसाठी ती व्यक्ती काहीही करायला तयार असते.वाटेत कितीही संकटं आली तरी ती व्यक्ती ...
रिक्षावाला बनला लेखक,निर्माता अन् कोरियोग्राफर,पोटाला चिमटा काढत कलेसाठी स्वतःला घेतलं वाहून
कलेवर एखाद्याची निष्ठा,प्रेम असेल तर त्या कलेसाठी ती व्यक्ती काहीही करायला तयार असते.वाटेत कितीही संकटं आली तरी ती व्यक्ती डगमगत नाही.त्यावर मात करत कलेसाठी सर्वस्व पणाला अर्पण करणारे समाजात मोजकेच असतात.अशाच कलाप्रेमी व्यक्तींमध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे.रिक्षा चालवत पोटाची खळगी भरणारा एक रिक्षावाला आता लेखक, नृत्य दिग्दर्शक आणि निर्माता बनला आहे.गोरख माने असं या रिक्षाचालकाचे नाव आहे.मुंबईत घाटकोपर इथल्या भटवाडी काजूपाडा इथल्या १० बाय १५ च्या खोलीत माने आणि त्यांचे कुटुंबीय राहतात. रिक्षा चालवून ते उदरनिर्वाह करतात.मात्र शालेय जीवनापासून असलेली कलेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.नववीपर्यंत शिक्षण झालेल्या माने यांनी मग कलेवरील याच प्रेमासाठी स्वतःच्या पोटाला चिमटा काढत नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावं यासाठी निर्मिती क्षेत्रात यायचं ठरवलं.रिक्षा चालवून दिवस भरात मिळणा-या उत्पन्नातुन त्यांनी विनोदी नाटकाची निर्मिती केलीय.माने यांनी स्वत:ची रसिक रंजनी ही नाट्य, नृत्य संस्था सुरू केली.त्यासाठी आर के सावंत यांच्याकडून त्यांनी नृत्याचेही शिक्षण घेतले.माया जाधव यांची ऑफर स्वीकारून कुणाल म्युझिक कंपनी अंतर्गत रेतीवाला नवरा पाहिजे या गाण्यासाठी नृत्याचे दिग्दर्शन केले.हे गाणं सुपरडुपर हिट झाले.त्यानंतर आग्री कोळ्यांची सावली,कायदा भीमाचा,खैरलांजी हत्याकांड,सर्गणी मोबाईल केलं या गाण्यावर नृत्य दिग्दर्शन केले आहे.व्यावसायिक नाटक चालवून कलाकारांना त्यांचं मानधन वेळेवर मिळावं यासाठी अनेकदा माने यांनी कर्ज काढले आहे.रिक्षाच्या उत्पनातून थोडे थोडे पैसे बाजूला करून माने कर्ज फेडतायत.गेल्या 12 वर्षांपासून ते या क्षेत्रात धडपड करत आहे.दिवसभर रिक्षा चालवून त्यांना 900 रुपये मिळतात.यातील प्रत्येकी 300 रुपये त्यांनी संस्थेच्या अकाउंटवर कलाकारांचा निधी म्हणून जमा केला.(Also Read:अशोक सराफ यांची ‘प्रियतमा सीमा’ जगतेय हलाखीचं जीणं, मायबाप सरकारकडूनही उपेक्षेमुळे झिजवतेय मंत्रालयाचे उंबरठे!) महाराष्ट्र हे कला संस्कृतीचं नंदनवन आहे.मात्र आज कलाकारांची अवस्था खूप बिकट आहे.स्पर्धेच्या जगात प्रत्येकाला संधी मिळणे कठीण झाले आहे.आज सोशल मीडियाद्वारे शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून अनेक कलाकार आपली आगळी वेगळी कला आजमावण्याचा प्रयत्न करताना दिसतात. कलाकारांची कला टिकून राहावी यासाठी माने यांनी स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता कलेसाठी आपले सर्वस्व पणाला लावले आहे.एक रिक्षावाला जेव्हा कलेवरील प्रेमापोटी स्वतः लेखक ,नृत्य दिग्दर्शक ते निर्माता अशी भरारी घेतो तेव्हा त्याला नक्कीच सॅल्युट करावा वाटेल.