Join us  

"बंदूक्या" काय जिन्नस हाय राव!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2017 4:31 AM

जुंदरी झटका असलेली गावरान बोलीभाषा काहीशी शिवराळ असली तरीही गुळमाट आहे बरं का! हेच वेगळेपण जपल्यामुळे राज्य शासनाच्या उत्कृष्ट चित्रपट, ...

जुंदरी झटका असलेली गावरान बोलीभाषा काहीशी शिवराळ असली तरीही गुळमाट आहे बरं का! हेच वेगळेपण जपल्यामुळे राज्य शासनाच्या उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट संवाद आणि उत्कृष्ट कथा या पुरस्कारांवर 'बंदूक्या'ने मोहोर उमटविली आहे. त्यामुळे प्रेक्षकही 'बंदूक्या' सिनेमाची खूप दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. एकाच आठवड्यात एकदम २ ते ३ मराठी सिनेमे प्रदर्शित होणारं चित्र आपण नेहमी पाहतो. अशा परिस्थितीमुळे कोणत्याही एका सिनेमाला प्रेक्षक पूर्णपणे न्याय देऊ शकत नाही. यात खरंतर प्रेक्षकांची देखील काहीही चूक नसते. गोंधळात टाकणारी परिस्थिती प्रेक्षकांसमोर असेल तर एकाला न्याय देणं अशक्य होतं.  
 
मात्र बंदूक्या प्रदर्शित होतोय म्हंटल्यावर इतर सर्व निर्माता-दिग्दर्शकांनी जबाबदारीचा निर्णय घेत आपल्या तलवारी म्यानात घातल्या आहेत. अशाच प्रकारे निर्मात्यांनी एकत्रितपणे पुढे येऊन एकमताने एका आठवड्यात एक सिनेमा असा निर्णय घेतला तर नक्कीच मराठी चित्रपटांची परिस्थिती सकारात्मकदृष्ट्या बदलेल. 'बंदूक्या'च्या हटके कलात्मक जाहिराती, खळबळ माजवणारे मोशन पोस्टर, सोशल मीडियावरील पोस्ट तसेच थिरकायला लावणाऱ्या आदर्श शिंदेच्या आवाजातील गाण्यामुळे 'बंदूक्या' 'मोस्ट डिस्कस्ड मुव्ही ऑफ द इयर' बनतोय. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळणाऱ्या या सिनेमाचं श्रेय अभ्यासू निर्माता-दिग्दर्शकाला जातं. वर्षा सिनेव्हिजनची निर्मिती असलेल्या बंदूक्या सिनेमाचं दिग्दर्शन राहूल मनोहर चौधरी यांनी केलं आहे. मराठी सिनेमाचा प्रेक्षकवर्ग देखील तितकाच चोखंदळ असल्याने निव्वळ मसालापट सादर करण्यापेक्षा मार्मिक सिनेमा 'बंदूक्या'च्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. अभिनेता शशांक शेंडे, अभिनेत्री अतिषा नाईक, नीलेश बोरसे, नामदेव मुरकुटे, अमोल बागुल यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. कलाकारांच्या खुमासदार अभिनयाने सिनेमाची उंची नक्कीच वाढली आहे.
 
बंदूक्याचं खरं वैशिष्ठ्य त्याच्या कथेत आहे. खरंतर या सिनेमाचा हिरो म्हणजे सिनेमाची कथा. एका विशिष्ट समाजातील प्रथेवर आधारित हा सिनेमा समाजात असणाऱ्या क्रूर रूढी परंपरांवर नेमकेपणाने बोट ठेवतो. अशा परंपरांबाबत जागरूकता आणण्या आधी त्याचं अस्तित्व समाजात किती खोलवर रुतलं आहे यावर बंदुक्याने थेट निशाणा साधला आहे. बंदूक्या पोट धरून हसवता हसवता कधी आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पडतो कळतही नाही. एक यशस्वी सिनेमा तयार होण्यासाठी उत्तम कथा-पटकथा-संवाद, कलाकारांचा सात्विक अभिनय आणि प्रदर्शनाची झालेली जय्यत तयारी असे योग्य प्रमाणात जमून आलेले जिन्नस बंदूक्याच्या यशाला शंभर टक्के हातभार लावतील आणि तो खऱ्या अर्थाने नशीबवान ठरेल यात वाद नाही.