Join us  

ग्लॅमरस अंदाजात साकारण्यात आला अमृता खानविलकर आणि अंकुश चौधरी यांचा मेणाचा पुतळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 6:00 AM

‘वाजले की बारा’ म्हणत रसिकांच्या काळजात घर केलेली अभिनेत्री अमृता खानविलकर आणि 'दुनियादारी' असो किंवा 'यंदा कर्तव्य आहे' अशा ...

‘वाजले की बारा’ म्हणत रसिकांच्या काळजात घर केलेली अभिनेत्री अमृता खानविलकर आणि 'दुनियादारी' असो किंवा 'यंदा कर्तव्य आहे' अशा सिनेमामधून रसिकांचा लाडका बनलेला अभिनेता अंकुश चौधरी. या दोन्ही मराठमोळ्या कलाकारांच्या शिरपेचात मानचा तुरा खोवला गेलाय. आजच्या पिढीचे आदर्श असणारे हे दोन्ही कलाकार वेगळ्या रुपात रसिकांच्या भेटीला आले आहेत. त्यांचं हे रुप कोणता सिनेमा, मालिका किंवा नाटकातलं रुप नाही. या दोघांचं नवं रुप आहे ते मेणाचं. अमृता खानविलकर आणि अंकुश चौधरी या दोघांचे मेणाचे पुतळे साकारण्यात आले आहेत. कोकणच्या मातीत देवगड इथं नव्याने उभारण्यात आलेल्या संग्रहालयात अमृता आणि अंकुशचे मेणाचे पुतळे बसवण्यात आले आहेत. 'दुनियादारी' या सिनेमात अंकुशने 'डीएसपी' ही भूमिका साकारली होती. या भूमिकेला आणि यातील अंकुशच्या लूकला रसिकांची भरभरुन पसंती मिळाली होती. दुनियादारीमधील याच डीएसपी लूकमध्ये अंकुशचा मेणाचा पुतळा साकारण्यात आला आहे.अंकुशसह अमृता खानविलकरचा ग्लॅमरस लूकमधला मेणाचा पुतळाही तितकाच आकर्षकरित्या साकारण्यात आला आहे. ग्लॅमरस अदांनी अमृताने रसिकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे तिच्या त्याच ग्लॅमरस अंदाजात हा मेणाचा पुतळा साकारण्यात आला आहे. सुनील कंदलूर या कलाकाराने हे मेणाचे पुतळे साकारले आहेत. या संग्रहालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, सुपरस्टार रजनीकांत, लिओनेल मेस्सी यांचे मेणाचे पुतळेही आहेत.आगामी काळात या ठिकाणी बिग बी अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित यांचे पुतळे उभारण्यात येणार आहेत. आता कोकणच्या मातीत देवगडमध्ये उभारण्यात आलेले हे संग्रहालय कोकणात येणा-या पर्यटकांसाठी खास डेस्टिनेशन ठरणार आहे.