Join us  

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन, मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 3:20 PM

किशोर नांदलस्कर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना ठाण्यातील बाळकुम परिसरातील ग्लोबल कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.

ठळक मुद्देमहेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांचा बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला.

किशोर नांदलस्कर यांनी मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचे आज दुपारी 12.30 च्या सुमारास ठाणे येथे कोरोनाने निधन झाले.

किशोर नांदलस्कर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना ठाण्यातील बाळकुम परिसरातील ग्लोबल कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. पण त्यांची प्राणज्योत मालवली. किशोर नांदलस्कर यांनी आत्तापर्यंत सुमारे ४० नाटके, २५ हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट आणि २० हून अधिक मालिकांमधून काम केले. ‘नाना करते प्यार’, ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ अशा अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या. ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ आदी नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं.

महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांचा बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला. ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’, प्राण जाए पर शान न जाए या हिंदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका देखील गाजल्या. 

किशोर नांदलस्कर अनेक वर्षांपासून बोरीवलीत राहात आहेत. पण त्यांची तब्येत बिघडल्याने ते ठाण्यात मुलाकडे राहात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं असा परिवार आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या