Join us  

‘वाजे पाऊल आपुले’ पुन्हा रंगभूमीवर, ५० वर्षांनंतर गाजलेली नाट्यकृती रसिकांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:54 PM

या दर्जेदार नाटकांच्या पुनश्च आगमनामुळे नाट्य रसिकांना एक अलौकिक अनुभूती मिळणार आहे. शिवाय ज्यांनी हे नाटक पन्नास वर्षांपूर्वी पाहिले आहे, त्यांनाही ते नक्कीच आवडेल असा विश्वासही जयंत सावरकर यांनी व्यक्त केला आहे. 

जुनी गाजलेली नाटकं नव्या रुपात रसिकांच्या भेटीला येत आहेत. नव्या रुपातील आणि नव्या संचातील ही नाटकं रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहेत. आता आणखी एक जुनं गाजलेलं नाटक पुन्हा रंगभूमीवर येत आहे. 'वाजे पाऊल आपुले' असं या नाटकाचं नाव आहे. अष्टपैलू साहित्यिक आणि नाटककार विश्राम बेडेकर लिखित ‘वाजे पाऊल आपुले’ या तुफान गाजलेल्या नाटकाचे नव्या संचातले प्रयोग येत्या २४ नोव्हेंबर पासून सर्वत्र सुरु होत आहेत. हरहुन्नरी विनोदी अभिनेते अभिजित चव्हाण, पूर्णिमा तळवलकर मुख्य व्यक्तिरेखा साकारत आहेत. सोबत अंशुमन म्हसकर, अमेय बोरकर आणि दिपकार पारकर हे गुणी कलावंत असून पूर्वीच्या संचात काम केलेले आणि सध्या हयात असलेले एकमेव जयंत सावरकर हेच या नाटकाचे दिग्दर्शन करीत असून त्यांनी पूर्वी केलेलीच भूमिका ते आताही या नाटकात करीत आहेत. 

१९६७ साली ‘वाजे पाऊल आपुले’ या नाटकाचे शेवटचे प्रयोग झाले.  त्यानंतर पन्नास वर्षांनी हे नाटक पुन्हा रंगमंचावर येत आहे. हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत असल्याने दिग्दर्शक अभिनेता जयंत सावरकर प्रचंड उत्साही आहेत. विश्राम बेडेकरांच्या हाताखाली सुमारे अडीच वर्षे त्यांचा सहाय्यक म्हणून काम केले होते. त्यामुळे आज हे नाटक बसवताना त्या अनुभवाची खूप मदत झाली अशा शब्दांत जयंत सावरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या दर्जेदार नाटकांच्या पुनश्च आगमनामुळे नाट्य रसिकांना एक अलौकिक अनुभूती मिळणार आहे. शिवाय ज्यांनी हे नाटक पन्नास वर्षांपूर्वी पाहिले आहे, त्यांनाही ते नक्कीच आवडेल असा विश्वासही जयंत सावरकर यांनी व्यक्त केला आहे.