Join us  

गाण्यावर अनोखा प्रयोग : पारख नात्यांची

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 4:38 AM

गाणी आणि चित्रपट हे एकमेकांचे पक्के धागे आहेत. सिनेमाच्या गोष्टीतील भावना उत्तमरीत्या प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याकरता गाण्याचा नेहमीच उपयोग केला जातो. ...

गाणी आणि चित्रपट हे एकमेकांचे पक्के धागे आहेत. सिनेमाच्या गोष्टीतील भावना उत्तमरीत्या प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याकरता गाण्याचा नेहमीच उपयोग केला जातो. शिवाय जसा काळ बदलत गेला तसं गाण्याचं रूप देखील बदलतं आहे. आता गोष्टीप्रमाणे गाण्यात देखील वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. असाच काहीसा गाण्यातला वेगळा प्रयोग, फायनल रेंडर निर्मिती संस्थेअंतर्गत प्रकाश जैननिर्मित आणि दिग्दर्शक-कॅमेरामन मुकेश मिश्रा यांनी आपल्या "पारख नात्यांची" या मराठी चित्रपटांत केला आहे. चित्रपटांतील कलाकार अनिकेत केळकर आणि सिया पाटील यांच्यावर एक बेफाम असे प्रणयगीत चित्रित करण्यात आलं आहे, पण इतकंच पुरेसं नाहीये, तर चक्क एका बैठकीच्या लावणीला प्रणयगीतात बंदिस्त करण्याचा वेगळाच प्रयोग यात करण्यात आला आहे. सिनेमात आधी फक्त बैठकीची लावणी होणार होती, पण त्यात बदल करून अभिनेत्री सिया पाटील ही हिरोला अर्थात अनिकेत केळकरला आजच्या पद्धतीने म्हणजेच मादक अदांनी तेही प्रत्यक्ष दृश्य रूपात आकर्षित करते. जेव्हा हा प्रयोग करण्यात आला तेव्हा तो फक्त बैठकीच्या लावणीपेक्षा अधिक परिणामकारक वाटला म्हणून आज सिनेमात तो तशाच प्रकारे ठेवण्यात आला आहे. आजवर असं मराठी चित्रपटांत कुणी केलं नाही. विवेक अस्थाना यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत अनुपमा देशपांडे यांनी गायले आहे.चित्रपटांत मिलिंद गवळी, निशा परुळेकर, अनिकेत केळकर, प्रदीप वेलणकर, प्रफुल्ल सामंत, मुग्धा शहा, स्मृती पारकर, मिलिंद शिंदे आणि सिया पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रकाश वैद्य यांच्या कथेला पूर्णपणे न्याय देत योगेश गवस, विराट भट आणि मुकेश मिस्त्री यांनी पटकथा साकारली आहे. संवाद योगेश गवस यांचे आहे तर आदर्श जैन या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत, नृत्य दिग्दर्शक दीपाली विचारे. २० एप्रिलपासून हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.