Join us  

'फाईल नंबर 498 A'ची होतेय चर्चा, जाणून घ्या काय आहे नेमकी भानगड?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2022 1:10 PM

File No.498 A: 'फाईल नंबर 498 A'ची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

मराठी चित्रपटांमध्ये आत्तापर्यंत न्यायव्यवस्थेशी संबंधित किंवा कोर्टरूम ड्रामा प्रकारातील काही चित्रपट येऊन गेले. त्यात आता मल्हार गणेश दिग्दर्शित "फाईल नंबर 498 A" (File No.498 A) या आगळ्यावेगळ्या नावाच्या चित्रपटाची भर पडत असून, या चित्रपटाचे टीझर पोस्टर नुकतेच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले आहे.या पोस्टरची सर्वत्र खूप चर्चा होताना दिसत आहे.

आरती श्रीधर तावरे यांची निर्मिती असलेल्या आणि मनीष हर्षा मुव्हीज प्रस्तुत फाईल नंबर - 498 A या चित्रपटाची कथा श्रीधर शंकर तावरे यांनी लिहिली आहे. तर श्रीधर शंकर तावरे आणि आशिष निनगुरकर यांनी पटकथा लिहिली आहे.  संवाद आणि गीतलेखन आशिष निनगुरकर यांचे आहे. स्वप्नील प्रफुल्ल यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. कायद्यातील 498 A या कलमाअंतर्गत एक तरुण कसा अडकतो याची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. 

कलाकारांची नावं अद्याप गुलदस्त्यात

आतापर्यंत काही चित्रपटांमध्ये कोर्टरूम ड्रामा सादर झाला असला, तरी फाईल नंबर- 498 A हा चित्रपट अधिक वेगळ्या पद्धतीने सादर होणार आहे. या पोस्टरवर मागणारे हात आणि मंगळसूत्रात बांधलेले हात, पार्श्वभूमीवर उडणारी कबुतरं दिसत असल्यानं स्वातंत्र्य, बंधनं या बाबतची मांडणी चित्रपटात असेल असा अंदाज आपल्याला करता येतो. या चित्रपटाचे पोस्टर लक्षवेधी असून त्याची चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे. या चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.