प्रत्येक चित्रपट काही ना काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो. कित्येकदा हा प्रयत्न थेट केला जातो, तर काही वेळा अप्रत्यक्षरीत्या काही ना काही सांगितलं जातं. समाजमनापर्यंत एखादा महत्त्वपूर्ण मेसेज किंवा मुद्दा पोहोचवण्यात मराठी सिनेमा नेहमी अग्रस्थानी राहिला असल्याचं पहायला मिळालं आहे. असाच एक महत्त्वपूर्ण मुद्दा मांडणाऱ्या नव्या कोऱ्या सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली. 'कठपुतली कॉलनी' (Kathputli Colony) असं अत्यंत उत्कंठा वाढवणारं या चित्रपटाचं शीर्षक आहे. शीर्षकावरून तरी चित्रपटात काय पहायला मिळणार याचे संकेत मिळत नसले तरी, यात प्रत्येक भारतीयाची गोष्ट असेल. निर्माते शामराव कृष्णाई पांडुरंग ससाने यांनी शाम ससाणे क्रिएशन्सच्या बॅनरखाली नुकतीच या चित्रपटाची घोषणा केली आहे. 'कठपुतली कॉलनी'ची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.
'कॉपी' फेम दिग्दर्शक दयासागर वानखेडे (Dayasagar Wankhede) या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. कोणतीही आव्हानात्मक भूमिका लीलया साकारण्यासाठी रसिकांच्या परिचयाचे असणारे मिलिंद शिंदे (Milind Shinde) यांच्या लेखणीतून 'कठपुतली कॉलनी'ची कथा साकार झाली आहे. या चित्रपटात मिलिंद शिंदे यांनी महत्त्वाची भूमिकाही साकारली असून, सध्या हिंदीत बिझी असणारे कवी मनाचे अभिनेते किशोर कदमही त्यांच्या जोडीला आहेत. प्रत्येक चित्रपटाच्या टायटलमध्ये काही का नाही तरी दडलेलं असतं, तसं 'कठपुतली कॉलनी'मध्ये काय दडलंय ते प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच समजेल. थोडक्यात सांगायचं तर ही एका गावाची, आपल्या घरादाराची, परसदाराची, शिरस्त्याची कहाणी आहे. या सगळ्याला 'अब्रू' नावाचा धगधगता ज्वालामुखी राखण बसलाय. त्या इभ्रतीसाठी एक लपाछपीचा, शिवाशिवीचा खेळ सुरू होतो त्याची गोष्ट 'कठपुतली कॉलनी'मध्ये दडलेली आहे.