Join us  

स्वप्निल आणि सचिनच्या अभिनयाची जुगलबंदी 'रणांगण'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 3:55 AM

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रणांगण' या चित्रपटात एक महत्त्वाकांक्षी राजकारणी आपल्या स्वाथार्साठी काय काय करू शकतो हे दाखवण्यात आले आहे. ...

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रणांगण' या चित्रपटात एक महत्त्वाकांक्षी राजकारणी आपल्या स्वाथार्साठी काय काय करू शकतो हे दाखवण्यात आले आहे. स्वप्निल जोशीला मराठी इंडस्ट्रीचा चॉकलेट हिरो म्हणूनच ओळखले जाते. पण एक वेगळा स्वप्निल प्रेक्षकांना रणांगण या चित्रपटात पाहायला मिळतोय. स्वप्निलच्या चाहत्यांसाठी त्याला या चित्रपटात पाहाणे हा एक सुखद धक्का आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. स्वप्निल आणि सचिन पिळगांवकर यांच्या अभिनयाच्या जुगलबंदीने समृद्ध झालेल्या रणांगण चित्रपटाच्या टीमने लोकमतशी संवाद साधला.  स्वप्निल जोशी म्हणाला  मी चॉकलेट हिरोची प्रतिमा घेऊन जन्माला आलेलो नाही. मला असे वाटते की, माझे काम आहे काम करत राहणे, विचार करणं लोकांचं काम आहे. अभिनेता म्हणून जे जे मला आव्हानात्मक वाटेल, अभिनेता म्हणून जे जे मला आनंद देईल. एकीकडे आपण म्हणतो की, काहितरी वेगळं करायला पाहिजे तर हा सिनेमा निश्चितपणे वेगळा आहे. मी प्रतिमा ब्रेक करायच्या हेतूने खलनायकाची भूमिका साकारली नाही. आपल्याशी जेव्हा एखादा व्यक्ती वाईट वागतो तेव्हा आपल्याला त्याचा त्रास होतो. पण मग आपण विचार करतो की तो तसाच आहे. तो वाईटच आहे. पण जेव्हा एखादा चांगला व्यक्ती आपल्याशी वाईट वागतो तेव्हा ते आयुष्यभर आपल्या आठवणीत असतं. हीच शॉक व्हॅल्यू सिनेमाच्या कथानकाची खरी गरज आहे.  सचिन पिळगावकर म्हणाले, एखादे पात्र उत्तम पद्धतीने साकारून प्रेक्षकांसमोर सादर करता येईल, याचा प्रयत्न सातत्याने माझ्याकडून आजवरच्या भूमिकांच्या माध्यमातून झाला आहे. शिवाय मी आणि स्वप्निल दिग्दर्शकाला अपेक्षित असणाऱ्या दृष्टिकोनातून अभिनय करणारे अभिनेते असल्याने त्यांनी दिलेल्या सूचनांचे नेहमी पालन करतो. कारण दिग्दर्शकच खऱ्या अर्थाने चित्रपटाचा पडद्यामागील नायक असतो. चित्रपटाप्रमाणेच स्वप्निल आणि माझे खऱ्या आयुष्यात पिता-पुत्राचे वेगळे नाते आहे. मात्र ते सकारात्मक आहे. त्यामुळे रणांगण चित्रपटात परस्परविरोधी भूमिका असूनही त्या सक्षमपणे साकारताना खऱ्या आयुष्यातील नात्यामध्ये असलेल्या समजूतदारपणाचा उपयोग झाला.     दिग्दर्शक राकेश सारंग म्हणाले, मालिकांनंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकाकडे वळत असताना केवळ कारकीर्दीमध्ये चित्रपट केला, या दृष्टिकोनामधून मिरविण्यापेक्षा चांगला आणि उत्तम चित्रपट करावा, याकडे माझा कल होता. शिवाय स्वप्निलसोबत अनेक मालिकांमध्ये काम केल्यामुळे त्याच्या अभिनयाच्या ताकदीविषयी कल्पना होती. शिवाय रणांगणमधील खल भूमिकेसाठी मी कोणत्याही खलनायक साकारलेल्या अभिनेत्याची निवड करु शकलो असतो. मात्र प्रेक्षकांना स्वप्निलला या भूमिकेतून पाहणं हा मोठा धक्का असणार आहे, या धक्कातंत्राचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातूनच त्याची या चित्रपटातील भूमिकेसाठी निवड करण्यात आली.       स्वप्निलसाठी रणांगणमधील भूमिका त्याच्या अभिनयक्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा आहे. बालकलाकार ते अभिनेता या यशस्वी स्थित्यंतरामागचं कारण स्पष्ट करताना प्रेक्षकांच्या मनामध्ये त्याच्या बाल भूमिकांची छबी आजही टिकून असल्याचं तो सांगतो.