Join us  

#MeToo त्याने माझ्या पाठीला स्पर्श केला आणि...

By प्राजक्ता चिटणीस | Published: October 27, 2018 1:27 PM

सुरेखा पुणेकर सांगतात, मी सजना तुझ्याचसाठी या चित्रपटात काम करत होते, त्यावेळी घडलेला प्रसंग कधीच विसरू शकत नाही.

मीटूचे वादळ बॉलिवूडमध्ये चांगलेच घोंगाळत आहे. पण मीटूवर मराठी इंडस्ट्री गप्प बसली आहे. लावणीसमाज्ञी सुरेखा पुणेकर यांनी लोकमतला नुकत्याच दिलेल्या एक्सक्ल्यूझिव्ह मुलाखतीत मराठी इंडस्ट्रीत होत असलेले लैंगिक अत्याचार आणि त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात आलेल्या एका अनुभवाविषयी सांगितले आहे.

मराठी इंडस्ट्रीत लैंगिक अत्याचार होत नाहीत का असे विचारले असता सुरेखा पुणेकर सांगतात, मराठी इंडस्ट्रीतही असे प्रकार सर्रास घडतात. पण ते नजरेआड घडत असल्याने त्याची वाच्यता होत नाही. मी सजना तुझ्याचसाठी या चित्रपटात काम करत होते, त्यावेळी घडलेला प्रसंग कधीच विसरू शकत नाही. चित्रपटातील खलनायक आणि माझे चित्रीकरण सुरू होते. दृश्याच्या मागणीनुसार मला त्यांनी स्पर्श करण्याची काहीही गरज नव्हती. पण त्यांनी माझ्या नकळतपणे माझ्या पाठीवरून त्यांचे दोन्ही हात फिरवले. या घटनेनंतर मला प्रचंड वाईट वाटले होते, मी खूप चिडले होते. मी चित्रपटाचे चित्रीकरणच थांबवले. शेवटी त्यांनी माझी माफी मागितली आणि त्यानंतर दोन तासांनी मी पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात केली. याचप्रकारे आणखी एका घटनेविषयी मी आवर्जून सांगेन. एका हिंदी चित्रपटाच्या निर्मात्याने मला चित्रपटात काम करण्यासाठी विचारले होते. त्यावर मी होकार दिला असता तुमच्या कार्यक्रमात अनेक मुली असतात, त्यांना आमच्या निर्मात्यासोबत बोलू द्याल का? असे त्याने मला विचारले. त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला लगेचच समजला. त्यामुळे यापुढे मला फोन करायचा नाही. माझ्या मुली या कॉलेज करून कार्यक्रम करतात, त्या अशा तशा मुली नाहीत असे मी त्यांना खडसावले होते. 

मराठी इंडस्ट्रीतील लोकांना समोर येऊन त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचारावर बोलण्याची गरज असल्याचे सुरेखा पुणेकर यांचे मत आहे. त्या सांगतात, मराठी इंडस्ट्रीत घडणाऱ्या प्रकारांविषयी मी ऐकले आहे आणि मी स्वतः ते पाहिले देखील आहे. पण आजकालच्या मुली निर्माते, दिग्दर्शक यांच्या विरोधात जात नाहीत. काम मिळवण्यासाठी दिग्दर्शक, निर्माते जे बोलतील ते त्या करायला तयार असतात अशी सध्या मराठी इंडस्ट्रीची परिस्थिती आहे. त्यांना केवळ प्रसिद्ध हवी आहे. पण मराठी इंडस्ट्रीतील लोकांनी पुढे येऊन त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराला वाचा फोडण्याची गरज आहे. 

टॅग्स :सुरेखा पुणेकरमीटू