Join us  

Sulochana Latkar Dies : अशोक कुमार यांच्या या सल्ल्यामुळे सुलोचना यांचं बदललं आयुष्य, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2023 8:47 PM

Sulochana Latkar : हिंदी आणि मराठी सिनेइंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे आज सायंकाळी निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या.

हिंदी आणि मराठी सिनेइंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांचे आज सायंकाळी निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीने प्रेमळ आई गमावली आहे. वयाच्या १४व्या वर्षी सुलोचना दीदींनी ‘चिमुकला संसार’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा हिंदी सिनेसृष्टीकडे वळवला. मात्र सुरुवातीला हिंदीत मोठ्या कलाकारांसोबत काम करत असताना सुलोचना दीदींच्या मनावर दडपण होते. मात्र त्यावेळी अभिनेते अशोक कुमार यांच्या एका सल्ल्यानंतर त्यांचे आयुष्य बदलून गेले.

सुलोचना दीदी यांनी हिंदी सिनेसृष्टीत काम करायला सुरुवात केल्यानंतर त्यांना मोठ्या कलाकारांसोबत काम करताना मनावर दडपण येऊ लागले. त्याचा प्रभाव त्यांच्या अभिनयातही दिसू लागला. त्या हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक कुमार यांच्यासोबत एका सिनेमात काम करत होत्या. त्यावेळी त्या वाक्य बोलताना त्यांच्या डोळ्यात न बघताच बोलू लागल्या. हे अशोक कुमार यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सीन थांबवून सुलोचना दीदींना समजावलं. 

अशोक कुमार यांनी दिला होता हा सल्ला

अशोक कुमार म्हणाले, 'हे असे चालणार नाही. तुम्ही जर माझ्या डोळ्यात न बघताच डायलॉग बोलत असाल तर त्याला काहीच अर्थ नाही. जोपर्यंत तुम्ही समोरच्या कलाकाराच्या डोळ्यात डोळे घालून वाक्य बोलत नाही तोपर्यंत तुमच्या अभिनयाला काहीच किंमत नाही. असे करून तुम्ही मलाही अडचणीत आणताय. तुम्हाला काय उत्तर द्यायचं हेच मला समजत नाहीये. हे बंद करा. तुम्हाला जर हिंदीत काम करायचे आहे, इथे शिकायचे आहे तर डोळ्यात डोळे घालून बोलावे लागेल.'

अशोक कुमार यांचे हे म्हणणे ऐकून सुलोचना दीदींना धीर आला. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी हिंदीमध्ये कपूर घराण्याच्या तिन्ही पिढ्यांसोबत काम केले. देव आनंद,सुनील दत्त,राजेश खन्ना अमिताभ बच्चन आदी सुपरस्टार अभिनेत्यांच्या आईची ऑनस्क्रीन भूमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी बऱ्याच हिंदी चित्रपटात काम केले.  

टॅग्स :सुलोचना दीदीअशोक कुमार