Join us  

Exclusive : तुझा भसाडा आवाज कसा चालेल? ‘बच्चन’ने सहन केलं तेच सोनाली कुलकर्णीच्याही वाट्याला आलं...!

By रूपाली मुधोळकर | Published: March 24, 2022 8:00 AM

Sonalee Kulkarni : महाराष्ट्राची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी आपल्या आवाजात देवेसेनेचं पात्र जिवंत केलं. यानिमित्त सोनालीने ‘लोकमत’शी संवाद साधला.

‘मॅन ऑफ द मिलेनियम’ अमिताभ बच्चन यांना एकेकाळी अति उंची आणि आवाजासाठी हेटाळणी सहन करावी लागली होती. आज अख्ख जग ज्या आवाजावर फिदा आहे, अमिताभ यांचा तोच आवाज एकेकाळी ‘ऑल इंडिया रेडिओ’नं रिजेक्ट केला होता. महाराष्ट्राची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिला सुद्धा करिअरच्या सुरूवातीला नेमका हाच अनुभव आला होता. होय, ‘बाहुबली’च्या मराठी व्हर्जनमध्ये देवसेनेच्या पात्राला आवाज देणाऱ्या  सोनालीचा आवाज कधीकाळी रिजेक्ट झाला होता. तुझा आवाज भसाडा आहे, असं म्हणून तिच्या आवाजाची खिल्ली उडवली गेली होती. हा अनुभव सोनालीने शेअर केला.

‘बाहुबली’च्या अभूतपूर्व यशाला मानवंदना देत ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ हे दोन्ही सिनेमे मराठीत डब केले गेले.   ‘शेमारू मराठीबाणा’ या वाहिनीवर हे सिनेमे प्रदर्शित झाले होते.अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मराठमोळ्या ‘बाहुबली’ची कलात्मक जबाबदारी सांभाळली आणि डॉ. अमोल कोल्हे,सोनाली कुलकर्णी, गश्मीर महाजनी, उदय सबनीस, संस्कृती बालगुडे, मेघना एरंडे अशा अनेक मराठी कलाकारांनी या चित्रपटांतील पात्रांना आपला आवाज दिला. महाराष्ट्राची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी आपल्या आवाजात देवेसेनेचं पात्र जिवंत केलं.  यानिमित्त सोनालीने ‘लोकमत’शी संवाद साधला.

तुझा भसाडा आवाज कसा चालेल?माझ्या पहिल्या चित्रपटात मी पाहुणी कलाकार म्हणून काम केलं होतं. ते माझं पहिलं काम होतं. त्यावेळी त्या चित्रपटातील माझ्या स्वत:च्या भूमिकेसाठी मला डबिंग करू दिलं गेलं नव्हतं. त्या भूमिकेला सुरेल आणि सुंदर आवाज हवा आहे, तुझा भसाडा आवाज कसा चालेल? असं त्या चित्रपटाच्या दिग्दर्शक-निर्मात्याचं म्हणणं होतं. तुम्ही तो सिनेमा पाहाल तर त्यात माझ्या कॅरेक्टरला माझा खरा आवाज नाहीये, हे तुमच्या लक्षात येईल. त्यावेळी मला डबिंग करू दिलं नाही. खरंच तेव्हा मला प्रचंड त्रास झाला होता.

माझ्या आवाजाबद्दल माझ्याच मनात शंका निर्माण झाली होती. खरंच माझा आवाज छान नाहीये का? तो भसाडा आहे का? असं मी स्वत:ला विचारायचे. पहिलाच सिनेमा होता आणि त्यात माझा आवाज रिजेक्ट झाला पाहून मी कमालीचे निराश झाले होते. पण यानंतर माझा मुख्य नायिका म्हणून पहिला सिनेमा आला. त्याला मात्र मी माझा आवाज दिला. एकेकाळी काही लोकांनी रिजेक्ट केलेला माझा आवाज  ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’साठी निवडला गेला, याचा   मोठा आनंद आहे. एक वर्तुळ पूर्ण झालंय, असं मला वाटतंय, असं सोनाली म्हणाली. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णी