Join us  

...म्हणून सिद्धार्थ चांदेकरने लावलं आईचं दुसरं लग्न; सावत्र वडिलांबद्दल पहिल्यांदाच बोलला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 6:23 PM

सिद्धार्थ चांदेकर एका मुलाखतीमध्ये सावत्र वडिलांबद्दल मोकळेपणाने बोलला. 

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. सिद्धार्थ अनेकदा त्याचे चित्रपट आणि हँडसम लूकमध्ये चर्चेत असतो. आईच्या उतारवयात एकटेपणा दूर करण्यासाठी सिद्धार्थने त्याची आई सीमा चांदेकर यांचं दुसरं लग्न लावून दिलं होतं. उतारवयात आईला जोडीदार मिळवून देणाऱ्या सिद्धार्थचं सर्वत्रच कौतुक झालं. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतेच एका मुलाखतीमध्ये त्याने आपल्या आईचं दुसरं लग्न का लावलं हे सांगितलं. शिवाय, सावत्र वडिलांबद्दल तो मोकळेपणाने बोलला. 

सिद्धार्थ चांदेकरने नुकतेच इट्स मज्जा या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तो म्हणाला, 'अभिनय क्षेत्रात असल्यामुळे असेल की काय माहीत नाही. पण डोळे वाचायला शिकलोय. ती व्यक्ती कशी आहे हे त्याच्या डोळ्यांमधून कळतं. सुरुवातीला आम्हाला थोडी भीती वाटत होती. पण, जेव्हा नितीन यांना आम्ही भेटलो. तेव्हा त्यांच्या डोळ्यात शुद्धपणा दिसला. इतके गोड आहेत ते. म्हणजे पुलंचं एक वाक्य आहे की ५० सशांची व्याकुळता दाटून आलेली असते. तसे आहेत ते. ते खूप साधे आहेत आणि माझी आई अजिबातच साधी नाहीये. तर ते छान जुळून आलं'.

 पुढे तो म्हणाला, 'मी जगावेगळे असे काही नाही केले. प्रत्येकाचे आयुष्य वेगळे आहे. माझी आई काय आयुष्य जगते हे मला माहिती आहे. तीला काय गरज आहे हे मला कळत होतं. तिला रोज संवाद साधण्यासाठी कुणाची तरी गरज होती. रोज गप्पा मारायला, चांगल-वाईट सांगायला तिला कुणाचीतरी गरज होती. हे आम्ही ओळखलं. आम्ही काही ग्रेट नाही केलं'. शिवाय, आपल्या आई वडिलांचे डोळे वाचायला शिका, असा सल्ला त्याने चाहत्यांना दिला.

सिद्धार्थची आई सीमा चांदेकर यांनी वयाच्या साठीनंतर दुसरं लग्न केलं. मुलगा सिद्धार्थने आईचं हे दुसरं लग्न लावलं. उतारवयात एकटंच उर्वरित आयुष्य जगण्यापेक्षा पुन्हा जोडीदार शोधायला काय हरकत आहे ही संकस्पना हळूहळू रुजत आहे. सिद्धार्थ आणि मिताली हेदेखील मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपं आहे. २०२१मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती.  

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकरमराठी अभिनेता