संकेत मोरे दिसणार लिव्ह इन लोचामध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 13:42 IST
संकेत मोरेने साईबाबा, वसुधा, रंग माझा वेगळा यांसारख्या मराठी मालिकांमध्ये तर कथा सरिता या हिंदी मालिकेमध्ये देखील काम केले ...
संकेत मोरे दिसणार लिव्ह इन लोचामध्ये
संकेत मोरेने साईबाबा, वसुधा, रंग माझा वेगळा यांसारख्या मराठी मालिकांमध्ये तर कथा सरिता या हिंदी मालिकेमध्ये देखील काम केले होते. नटसम्राट, टक्केवारी यांसारख्या मराठी नाटकातदेखील तो झळकला होता. तसेच मोहिनी, रघुपती राघव राजाराम, तुझी माझी लव्ह स्टोरी यांसारख्या मराठी चित्रपटातून त्याने आपली अभिनयक्षमता दाखवून दिली आहे. तसेच हाँटेड हाऊससारख्या हिंदी चित्रपटातही त्याने काम केले आहे. आता तो लिव्ह इन लोचा या वेबसिरिजमध्ये झळकणार आहे. सध्याचे तरुण हे लग्नापेक्षा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहाणे पसंत करत आहेत. पण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहाणे देखील सोपे नसते. अनेक चढ-उतार त्यांच्या नात्यात येतच असतात. याच लिव्ह इन रिलेशनशिपवर भाष्य करणारी लिव्ह इन लोचा ही वेबसिरिज आहे. लिव्ह इन लोचा या वेबसिरिजमध्ये प्रेक्षकांना राहुल आणि निशाची कथा पाहायला मिळणार आहे. राहुल निशाला पाहाताच क्षणी तिच्या प्रेमात पडतो. पण हे केवळ आकर्षण असल्याचे काही दिवसांनी त्याच्या लक्षात येते तर दुसरीकडे निशा ही राहुलच्या बाबतीत प्रचंड पझेसिव्ह असते. राहुल काही काळानंतर निशाकडे तो दुर्लक्ष करायला लागतो. पण निशापासून दूर गेल्यावर त्याचे निशावर खरे प्रेम असल्याचे त्याला जाणवते. निशाला तो आयुष्यात परत आणण्यासाठी अनेक प्रयत्न करतो. निशादेखील त्याला माफ करण्याचे ठरवते. पण त्या दोघांमध्ये आता पूर्वीसारखे बाँडिंग राहिलेले नसते. या सगळ्यातून त्यांच्या नात्यात पुढे काय घडते. ते दोघे पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात का हे लिव्ह इन लोचामध्ये पाहायला मिळणार आहे.