Join us  

सुबोध-श्रुतीचे 'शुभ लग्न सावधान', रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार लग्न सोहळ्याची धम्माल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 6:06 PM

'शुभ लग्न सावधान' सिनेमाच्या माध्यमातून लग्नातील धम्माल, मजामस्ती, यातून निर्माण होणारी नात्यांची गुंतागुंत या मराठी सिनेमात रसिकांना अनुभवता येणार आहे.

लग्नातील धम्माल, मजामस्ती, यातून निर्माण होणारी नात्यांची गुंतागुंत यावर आधारित हिंदीत तुफान हिट ठरले  असले तरी मराठीत असा प्रयोग झालेला नाही. त्यामुळे 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ है' अशा सिनेमांसारखी कथा  आता मराठी सिनेमातही पाहायला मिळणार आहे.'शुभ लग्न सावधान' सिनेमाच्या माध्यमातून लग्नातील धम्माल, मजामस्ती, यातून निर्माण होणारी नात्यांची गुंतागुंत या मराठी सिनेमात रसिकांना अनुभवता येणार आहे.

समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित या सिनेमाचे सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच मुख्य पोस्टर लाँच करण्यात आले. या सिनेमाच्या पोस्टरवर सुबोध भावे आणि श्रुती मराठे या मराठीच्या प्रसिद्ध कलाकारांची केमिस्ट्री पाहायला मिळते. शिवाय दुबईतील विहंगम दृश्यदेखील या सिनेमाच्या पोस्टरवर आपल्याला पाहायला मिळते. पल्लवी विनय जोशी यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात, डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत ,विद्याधर जोशी ,किशोरी आंबिये यांचीदेखील महत्वपूर्ण भूमिका आहे. लगीनघाईवर आधारित असलेल्या या संपूर्ण सिनेमात मराठमोळ्या लग्नाचे सनईचौघडयांचा नाद रसिकांना अनुभवता येणार आहे.

'बंध नायलॉन'चे या मराठी सिनेमानंतर अभिनेता सुबोध भावे आणि श्रुती मराठी या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. तब्बल दोन वर्षांनी ही जोडी रसिकांना पाहायला मिळणार आहे. सुबोध आणि श्रुती यांच्यासह डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, किशोरी अंबिये, आनंद इंगळे अशी दमदार कलाकारांची तगडी फौज असणार आहे. या सिनेमाचं शुटिंग दुबई आणि इगतपुरीमध्ये झालं आहे. लग्नाच्या निमित्ताने कुटुंबीय,नातेवाईक, मित्रपरिवार एकत्र येतात. त्यानंतर कशी धम्माल,मजामस्ती होते, नात्यांचे बंध कसे उलगडतात हे या सिनेमातून पाहायला मिळणार आहे.

डेस्टिनेशन वेडिंग, लग्न सोहळ्यातील परंपरा आणि लग्नसंस्था हे रसिकांना अनुभवता येणार आहे. सध्या लोकांचा लग्नसंस्था, यातील परंपरा यावरील विश्वास उडत चालला आहे. या गोष्टी काळाच्या ओघात लुप्त होऊ नये यासाठी सिनेमातून प्रयत्न केल्याचे समीर यांनी सांगितले आहे. हा सिनेमा  १२ ऑक्टोबरला प्रदर्शित होणारा  असून सध्या विवाहोत्सुकांसाठी खूप खास ठरणार आहे, हे मात्र निश्चित !

टॅग्स :सुबोध भावे श्रुती मराठे