Join us  

शृजा प्रभूदेसाई साकारणार आजी, या नाटकात झळकणार महत्त्वपूर्ण भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 11:33 AM

‘बयो’ या व्यक्तिरेखेतून एका वेगळ्या रुपात रंगमंचावर दिसणार असून त्यांच्या सोबत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे या नाटकात नानासाहेबांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन राजेश देशपांडे यांचे आहे.

नाटक व मालिकांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री शृजा प्रभूदेसाई लवकरच एका महत्त्वपूर्ण भूमिकेतून आपल्यासमोर येणार आहे. १९७२ साली आलेल्या ‘हिमालयाची सावली’ या नाटकातील ज्येष्ठ अभिनेत्री शांता जोग यांच्या अभिनयाने सजलेली ‘बयो’ ही व्यक्तिरेखा त्या साकारणार आहेत. १९७२ साली गाजलेलं हे नाटक लवकरच नव्या संचात रंगभूमीवर येणार आहे. अभिनेत्री शृजा प्रभूदेसाई यांनी आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या मात्र ‘बयो’ या व्यक्तिरेखेतून एका वेगळ्या रुपात रंगमंचावर दिसणार असून त्यांच्या सोबत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे या नाटकात नानासाहेबांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन राजेश देशपांडे यांचे आहे.

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना शृजा सांगतात की, ‘अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी ही आव्हानात्मक भूमिका आहे. या व्यक्तिरेखेचे वेगवेगळे कंगोरे साकारण्यात आव्हान असले तरी या व्यक्तिरेखेतून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळताहेत. माझ्या वयापेक्षा अधिक वयाची ही भूमिका असल्याने त्यासाठी आवश्यक भाव, देहबोली या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ही भूमिका करायची होती. बयो आणि मी स्वतः कोकणातली असल्यामुळे तिची भाषा आणि लकबी पकडणं मला सोयीचं होत आहे. नाट्यरसिकांना ही भूमिका आवडेल असा विश्वास शृजा व्यक्त करतात. दिग्दर्शक राजेश देशपांडे, अभिनेते शरद पोंक्षे यांचे अमूल्य मार्गदर्शन इतर सहकलाकारांची उत्तम साथ या सगळ्यांमुळे मला वेगळ्या स्तरावर नेणारी भूमिका साकारणं शक्य झाल्याचं त्या आवर्जून सांगतात.

प्रा.वसंत कानेटकर यांची जन्मभूमी असलेल्या नाशिकमध्ये रविवार २९ सप्टेंबरला ‘हिमालयाची सावली’ नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. या नाटकात ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, शृजा प्रभूदेसाई, जयंत घाटे, विघ्नेश जोशी, कपिल रेडकर, ओमकार कर्वे, कृष्णा राजशेखर, प्रकाश साबळे, मकरंद नवघरे, वासंतिका वाळके, पंकज खामकर यांच्या भूमिका आहेत.