शशांक केतकर, मंगेश कदम, लीना भागवत यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'गोष्ट तशी गमतीची' या नाटकाचे ४०० प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 09:55 IST
सध्या बहुतांश नाटकांचे मोजकेच प्रयोग होतात. रसिक रंगभूमीकडे हल्ली वळत नाहीत असेच म्हटले जाते. पण त्यातही गोष्ट तशी गमतीची ...
शशांक केतकर, मंगेश कदम, लीना भागवत यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'गोष्ट तशी गमतीची' या नाटकाचे ४०० प्रयोग
सध्या बहुतांश नाटकांचे मोजकेच प्रयोग होतात. रसिक रंगभूमीकडे हल्ली वळत नाहीत असेच म्हटले जाते. पण त्यातही गोष्ट तशी गमतीची या नाटकाने ४०० प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी म्हणजेच २० ऑक्टोबर रोजी या नाटकाचा ४०० वा प्रयोग रंगणार आहे. नाटक म्हटले की, नाटकाचे विविध भागांत दौरे हे आले. त्यामुळे अनेकवेळा दौऱ्यांना जाणे शक्य नसल्याने नाटकात कलाकारांचे रिप्लेसमेंट होतच असते. पण आतापर्यंत या नाटकात एकही रिप्लेसमेंट झालेली नाही. सोनल प्रॉडक्शनच्या नंदू कदम यांनी निर्मिती केलेल्या या नाटकाचे लेखन मिहिर राजदा यांनी केले आहे. तर अद्वैत दादरकर यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. शशांक केतकर, मंगेश कदम, लीना भागवत यांच्या या नाटकात प्रमुख भूमिका आहेत. या नाटकाद्वारे शशांकने व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले होते. आतापर्यंत या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला आहे. जवळपास तीन वर्षांत या नाटकाने ४०० प्रयोग केले आहेत. शशांक आणि लीना यांचे ४०० प्रयोगांचा टप्पा गाठणारे हे पहिलंच नाटक आहे. अभिजित पेंढारकर यांचे संगीत, अमिता खोपकर यांची वेशभूषा, प्रदीप पाटील यांचे नेपथ्य आणि रवी करमरकर यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभली आहे. ४०० प्रयोग पूर्ण झाल्याबद्दल या नाटकात मुख्य भूमिकेत असलेल्या लीना भागवत सांगतात, 'एकही रिप्लेसमेंट न करता ४०० प्रयोग करणे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. या नाटकाने समाधान आणि आनंद अशा दोन्ही गोष्टी दिल्या. नाटक पाहिलेल्या प्रेक्षकांना या नाटकातील कुटुंब हे आमचे खरखुरे कुटुंब वाटते, ही आमच्या कामाची मोठी पावती आहे. चारशे प्रयोग होत असले, तरी आम्ही तितक्याच उत्साहाने काम करतोय, प्रत्येक प्रयोगात काहीतरी वेगळं करण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळेच नाटकातला ताजेपणा टिकून राहतो. ४०० प्रयोग पूर्ण होणं आनंददायीच आहे.' मंगेश कदम आपला आनंद व्यक्त करताना सांगतात, 'महाराष्ट्रासह परदेशातही या नाटकाचे प्रयोग झाले आहेत. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना हे नाटक जितकं आपलं वाटतं, तितकंच ते परदेशातल्या प्रेक्षकांनाही वाटतं, हेच या नाटकाचं यश आहे.'Also ead : गोष्ट तशी गंमतीची हे नाटक आता, गुजरातीमध्ये