Join us  

सविता दामोदर पराजंपे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 3:32 PM

‘सविता दामोदर परांजपे’ हे नाटक १९८५ मध्ये रंगभूमीवर आलं होतं. रीमा लागू यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या नाटकाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं.

ठळक मुद्दे‘सविता दामोदर परांजपे’ हे नाटक १९८५ मध्ये रंगभूमीवर आलं होतं‘सविता दामोदर पराजंपे’ 'ची कथा शरद आणि कुसुम या दांपत्‍याभोवती फिरते

भय, उत्‍कंठा आणि रहस्‍य यांची सांगड असलेले रहस्यमय चित्रपट कायमच प्रेक्षक पसंतीस उतरले आहेत. प्रेक्षकांची हीच पसंती लक्षात घेत ‘सविता दामोदर पराजंपे’ हा असाच एक थरारपट निर्माता जॉन अब्राहम आणि दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे–जोशी ३१ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ‘सविता दामोदर परांजपे’ हे नाटक १९८५ मध्ये रंगभूमीवर आलं होतं. रीमा लागू यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या नाटकाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. आजच्या पिढीला हा अनुभव घेता यावा याकरीता ‘सविता दामोदर परांजपे’ हे नाटक सिनेमाच्या रूपात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न निर्माता व दिग्दर्शकांनी केला आहे.

‘सविता दामोदर पराजंपे’ 'ची कथा शरद आणि कुसुम या दांपत्‍याभोवती फिरते. शरदचे कुसुमवर नितांत प्रेम असते, कुसुमच्या आयुष्यात अचानक चमत्‍कारिक आणि भीतीदायक घटना घडू लागतात. त्‍यामुळे त्यांच्या जीवनाला वेगळे वळण मिळतं काही काळानंतर यामागील गूढ आणखी वाढत जाते. या घटनांमुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर येतो. या दांपत्‍याचा संसार कोण उद्ध्वस्त करु पाहत आहे? यापासून त्यांचा बचाव कोण करतो? हे दाम्पत्य या घटनांना कसे सामोरे जाते? एकामागोमाग घडणा-या घटनांची उकल करण्यात या दाम्पत्याला यश मिळतं का?  या साऱ्या प्रश्नांची उत्तर आपणाला पडद्यावर पहायला मिळतील.

मंदार चोळकर व वैभव जोशी लिखित या चित्रपटातील गीतांना निलेश मोहरीर आणि अमित राज यांचं सुश्राव्य संगीत लाभले आहे. ‘जादुगरी’, ‘श्री स्वामी समर्थ, ‘किती सावरावा’, ‘वेल्हाळा’ अशी वेगवेगळ्या पठडीतली चार गीते या चित्रपटात असून स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, जान्हवी प्रभू–अरोरा, निशा उपाध्याय-कापाडिया या गायकांच्या सुरेल आवाजात ही गीते स्वरबद्ध झाली आहेत.

या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता जॉन अब्राहम आणि अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांची निर्मीती व वितरण करणारे ‘पॅनोरमा स्टुडिओज’चे कुमार मंगत पाठक यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. ‘जे.ए.एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदि कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. उत्तम संहितेसोबत संगीत व गाण्याचा वेगळा बाज या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे.

चित्रपटाची कथा शेखर ताम्हाणे यांची असून लेखन व संवाद शिरीष लाटकर यांचे आहेत. योगेंद्र मोगरे, तृप्ती मधुकर तोरडमल सहनिर्माते आहेत. छायांकन प्रसाद भेंडे तर संकलन क्षितिजा खंडागळे यांचे आहे. कलादिग्दर्शन संतोष फुटाणे, ध्वनी संयोजन प्रणाम पानसरे यांचे आहे. वेशभूषा मालविका बजाज यांनी तर मेकअप विनोद सरोदे यांनी केला आहे. ‘सविता दामोदर पराजंपे’ ३१ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

.

टॅग्स :सुबोध भावे