Join us  

'तुमच्या प्रेमाची आणि कष्टाची जाण...', आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त संतोष जुवेकरची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 1:39 PM

संतोष सोशल मीडियावर सक्रिय असतो.

मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर त्याच्या हटके लुकसाठी आणि अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. संतोषनं मराठीसह हिंदी सिनेमे आणि वेब सीरिजमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. संतोष सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो कायमच विविध व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. नुकतंच संतोषने आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

संतोषने त्यांच्या आई-वडिलांचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला त्याने 'शुक्रतारा मंद वारा' हे गाणे जोडले. तर या गोड फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहले, 'काल आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि आज मी ही पोस्ट शेअर करतोय. कारण मला हवा तसा फोटो सापडत नव्हता आणि आज सापडला आणि त्यांचा हा फोटो मला खूप आवडलाय. आईने काल बाबांना स्मार्ट फोन गिफ्ट केला आणि ती त्यांना तो कसा वापरायचा हे शिकवत होती. बाबा आईच नीट लक्ष देऊन ऎकत होते.अगदी असच ते लग्न झाल्यापासून आईचच लक्ष देवून ऐकत आले आहेत. म्हणून आजही सुरक्षित आणि उत्तम आयुष्य जगतायत'.

पुढे तो म्हणाला, 'आईने काल तिची लग्नातली आठवण सांगितली. लग्न झाल्यावर सासरी जाताना तिची आई म्हणाली होती, आता तू आमची राहिली नाहीस आता तु तुझा संसार खंबीरपणे सांभाळ. हागल्या-पादल्याला माहेरी यायचं नाही. तुमचे प्रश्न तुम्ही सोडवा पादा पण नांदा. आई बाबा मला तुमचा खूप अभिमान आहे. तुम्ही दोघांनी करून दाखवल, लढलात पडलात पुन्हा लढलात. तुम्ही तुमच्या संसारासाठी अगदी आमच्या सकट जे केलं आहे, ते खूप अमूल्य आहे. तुमच्या प्रेमाची आणि कष्टाची जाण आम्हाला कायम राहो. हाच तुमचा आणि देवाचा आम्हाला आशिर्वाद लाभुदे'.

संतोष जुवेकरने ‘झेंडा’, ‘रेगे’, ‘३६ गुण’, ‘पोलीस लाईन’ अशा अनेक चित्रपटांत काम केलं आहे. २०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘मोरया’ सिनेमामुळे संतोष प्रसिद्धीझोतात आला. संतोष 'रावरंभा' चित्रपटात ऐतिहासिक भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात त्याने 'जालिंदर' ही भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'डेट भेट' चित्रपटात तो प्रमुख भूमिका साकारताना दिसला. 'मायनस ३१' या हिंदी चित्रपटातही तो झळकला होता. 

टॅग्स :संतोष जुवेकरमराठी अभिनेतासेलिब्रिटी