संतोष जुवेकर बनला शिक्षक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 16:11 IST
आज शिक्षणपद्धतीत अनेक बदल घडताना दिसून येताहेत. त्यामुळे गुरूशिष्य ही परंपरा देखील कालानुक्रमे बदलत चालली आहे. पूर्वीसारखे 'छडी लागे ...
संतोष जुवेकर बनला शिक्षक
आज शिक्षणपद्धतीत अनेक बदल घडताना दिसून येताहेत. त्यामुळे गुरूशिष्य ही परंपरा देखील कालानुक्रमे बदलत चालली आहे. पूर्वीसारखे 'छडी लागे छम छम...' ही पद्धत न अवलंबता विद्यार्थ्यांची मने ओळखणारा, त्यांच्या कलेने घेणारा शिक्षक आजच्या घडीला हवा आहे. सालाबादप्रमाणे येत्या ५ सप्टेंबर रोजी होत असलेल्या जागतिक शिक्षण दिनानिमित्त मराठी अभिनेता संतोष जुवेकर याने आदर्श शिक्षकाबद्दलची आपली व्याख्या सांगितली. 'चांगला शिक्षक कसा असावा, याबद्दल मी काय सांगणार? फक्त मुलांच्या मनाचे ओळखणारा, त्यांची मने जपणारा शिक्षक असावा,' असे संतोष सांगतो. 'बॉईज' या आगामी सिनेमात संतोषने अशाच एका मनकवड्या शिक्षकाची भूमिका साकारली आहे. शिस्त आणि शासन कितपत कडक असायला हवे आणि त्यामुळे मुलांच्या मनावर आघात होणार नाही ना, याची काळजी घेतली पाहिजे असे मानणाऱ्या शिक्षकाची भूमिका मी यात साकारली आहे. हा शिक्षक मुलांचा लाडका असून ही भूमिका साकारताना खूप मज्जा आली असल्याचे संतोष सांगतो. यापूर्वीच्या अनेक चित्रपटात आपण संतोषला अँग्री यंग मेनच्या भूमिकेत पाहिले होते. मात्र बॉईज सिनेमात त्याने साकारलेला संवेदनशील शिक्षक खूपच वेगळा आहे. संतोषच्या चाहत्यांना त्याची ही व्यक्तिरेखा नक्कीच आवडेल. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे लालसाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे निर्मित आणि विशाल देवरुखकर दिग्दर्शित बॉईज या सिनेमात पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतीक लाड यांची प्रमुख भूमिका आहे. अवधूत गुप्ते याची प्रस्तुती असणारा हा सिनेमा येत्या ८ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. Also Read : 'लग्नाळू' गाणे लिहिण्यासाठी अवधुत गुप्तेला या गोष्टीमुळे मिळाली प्रेरणा