Join us  

सई ताम्हणकर झाली या मेकअप आर्टिस्टवर फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2017 7:39 AM

जोश फाऊंडेशन ही संस्था अपंगांसाठी खूपच चांगल्या प्रकारे काम करत आहे. त्यांना पायावर उभे करण्यासाठी ही संस्था झटत असते. ...

जोश फाऊंडेशन ही संस्था अपंगांसाठी खूपच चांगल्या प्रकारे काम करत आहे. त्यांना पायावर उभे करण्यासाठी ही संस्था झटत असते. मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर आता या संस्थेशी जोडली गेली आहे. जोश संस्थेचा मूकबधीर मुलांना स्वबळावर उभे करण्याचा उपक्रम सईला फारच आवडला आणि त्यानंतर सई देखील या कामात सहभागी झाली. जोश संस्थेतील मूकबधीर विद्यार्थिनी सारा थडानी पटेल ही सध्या हेअर आर्टिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून इंडस्ट्रीत काम करत आहे. तिने फॅशन चित्रपट आणि लॅक्मे फॅशन वीकसाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. तिच्या या यशावर जोश फाऊंडेशनने एक Shining Through Stars हा लघुपट बनवला आहे. हा लघुपट नुकताच सईच्या उपस्थितीत मुंबईतील मिठीबाई कॉलेज येथे दाखवण्यात आला. मेकअप आर्टिस्ट सारा थडानीकडून सईने देखील स्वतःचा मेकअप करून घेतला आहे. याविषयी सई सांगते, "सारा ज्या आत्मविश्वासाने कामाला सुरुवात करते, तो पाहून तुम्हाला तिच्या कामाबद्दल काहीही शंका येत नाही. ती तिचे काम खूप मनापासून आणि कल्पकतेने करते. तिचे काम पाहून तिच्या मूकबधीर असण्यामागच्या तुमच्या ज्या काही शंकाकुशंका असतील त्या अगदी झटक्यात दूर होतात. ती खूपच चांगली आर्टिस्ट आहे." जोश फाऊंडेशन या फाऊंडेशनसोबत काम करताना सईला खूप काही नवीन शिकायला मिळाले. याविषयी सई सांगते, "समाजात मूकबधीर मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूपच दयनीय आहे. आपण नेहमी त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहतो आणि त्यांना आपल्या सहानुभूतीची गरज आहे असे समजतो. पण हे चुकीचं आहे. खरंतर ही मुलं खूप स्ट्राँग आणि प्रचंड हुशार असतात. खूप मेहनतीने त्यांना गोष्टी शिकाव्या लागतात, पण ते त्या आपल्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे सगळ्याच गोष्टी शिकतात. ही मुले खूप स्वावलंबी असतात. समाजाने त्यांना सहजतेने वागवले पाहिजे. माणसाची ओळख त्याच्या कामातून असते आणि या मुलांचे काम नक्कीच त्यांना त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करून देतं."  Also Read : सई ताम्हणकर दिसणार सोलो या दाक्षिणात्य चित्रपटात