Join us  

समांतर 2 मध्ये मराठीतील आघाडीची अभिनेत्री दिसणार कुमारच्या आयुष्यातील गूढ स्त्रीच्या भूमिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 3:22 PM

कुमार महाजनच्या आयुष्यात गूढ स्त्रीचा प्रवेश होणार असून ही भूमिका मराठीतील आघाडीची अभिनेत्री साकारणार आहे.

ठळक मुद्देसिझन १ चे कथानक प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. यात कुमार महाजनने सुदर्शन चक्रपाणीचा शोध घेतला, जो आधीच कुमारचे जीवन जगला होता आणि येणाऱ्या काळात काय घडणार आहे, हे तो सांगू शकत होता.

असं म्हणतात नशिबात जे लिखित आहे, ते होतच... मात्र तुमच्या भविष्यात काय लिहून ठेवलंय, हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही ते भविष्य पुन्हा लिहू इच्छिता?  तुम्हाला असं वाटतं का, तुम्ही ते बदलू शकता? नियतीच्या विचित्र मार्गावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मएक्स ओरिजनल सिरीज 'समांतर' आपला सिझन २ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाली आहे. यात अभिनेता स्वप्नील जोशी पुन्हा एकदा कुमार महाजनच्या भूमिकेत दिसणार असून नितीश भारद्वाज, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. टीझरमुळे प्रेक्षकांच्या मनात 'समांतर' सिझन २ विषयी आधीच खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. तर आता 'समांतर'चा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कुमार महाजनच्या बाबतीत काय चूक झाली असेल याचा प्रेक्षक अंदाज बांधत असून एखाद्या माणसाचे कर्म दुसऱ्याचे भविष्य कसे असेल, हे यात अधोरेखित केले आहे.  

 सिझन १ चे कथानक प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. यात कुमार महाजनने सुदर्शन चक्रपाणीचा शोध घेतला, जो आधीच कुमारचे जीवन जगला होता आणि येणाऱ्या काळात काय घडणार आहे, हे तो सांगू शकत होता. सिझन २ मध्ये चक्रपाणीने कुमारला डायरी दिली आहे, ज्यात त्यांच्या आयुष्याचा तपशील आहे. यात एक नवीन स्त्री कुमारच्या आयुष्यात येणार असल्याचे भाकीत आहे. त्यानंतर कुमारचा त्याच्या नशिबाचा शोध सुरू होतो. या डायरीत लिहिण्यात आलेल्या गोष्टी थांबवण्यासाठी कुमारचा सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत आणि यात या गूढ स्त्रीचा कुमारच्या आयुष्यात प्रवेश होतो. ही गूढ स्त्री कोण आहे आणि चक्रपाणीने आपल्या डायरीत नमूद केल्याप्रमाणे कुमारला नाशिबाचा सामना करावा लागणार का, याचा शोध १० भागांच्या थ्रिलरमध्ये आहे.

 सिझन २ बद्दल स्वप्नील जोशीसांगतो, ''प्रेक्षकांच्या सर्व अपेक्षांपलीकडे जाऊन 'समांतर'ने प्रादेशिक वेब शो अशी ओळख प्राप्त केली आहे. भाषेचा अडथळा मोडकळीत काढत, सर्व भाषिक प्रेक्षकांना या वेब शो ने आपलंस केलंय. 'समांतर'चा पहिला सिझन येऊन आता वर्ष उलटले आहे. मला माहीत आहे की, प्रेक्षक आता सिझन २ ची आतुरतेने वाट पाहात आहेत. सिझन २ मध्ये कुमारचा प्रवास एका अनपेक्षित वळणावर येणार असून यात हा प्रश्न उपस्थित होणार आहे, की जर तुम्हाला तुमचं भविष्य माहित असेल, तर ते बदलणे शक्य आहे का?'' 

 सुदर्शन चक्रपाणीची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते नितीश भारद्वाज सांगतात, ''एक अभिनेता म्हणून माझ्या नव्या रुपाला सिझन १ मध्ये खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. प्रेक्षक सुद्धा नवनवीन संकल्पना स्वीकारत आहेत, हे पाहून खूपच छान वाटतंय. एक अभिनेता म्हणून या अनोख्या कथानकाचा भाग होण्यासाठी मी उत्सुक आहे. चक्रपाणीचे आयुष्य कुमारच्या जीवनाचे प्रतिबिंब होईल की, काही मनोरंजक वळणे घेत कुमारच्या उत्तरांच्या शोधाचे अनुसरण करत राहील? हे सिझन २ पाहिल्यावरच कळेल.''   'समांतर'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. यात आपल्याला सई ताम्हणकर देखील दिसत असून ती कुमारच्या आयुष्यातील गूढ स्त्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. 'समांतर' या थ्रिलर वेब शोचा हा सिझन मराठीसह हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत प्रेक्षकांना १ जुलैपासून एमएक्स प्लेअरवर विनामूल्य पाहता येणार आहे.

टॅग्स :स्वप्निल जोशीसई ताम्हणकर