Join us

ऋषी सक्सेनाचा मराठमोळा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 15:32 IST

अभिनेता ऋषी सक्सेना 'वक्रतुंड महाकाय' या अल्बममध्ये दिसणार आहे.

ठळक मुद्दे 'वक्रतुंड महाकाय' अल्बमला स्वरसाज दिलाय अवधूत गुप्ते व आदर्श शिंदेने 'वक्रतुंड महाकाय' अल्बममध्ये दिसणार ऋषी सक्सेनासह रिचा अग्नीहोत्री व निरंजन जोशी

अभिनेता ऋषी सक्सेनाने 'काहे दिया परदेस' या मालिकेतून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या मालिकेत त्याने साकारलेली शिवची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली. ही मालिका संपून बरेच दिवस उलटले असले तरी शिवची जागा प्रेक्षकांच्या मनात काय आहे. ऋषी हा मराठी नसूनही त्याला मराठीची ओढ आहे. त्यामुळेच तो मराठी इंडस्ट्रीत काम करतो आहे. काही दिवसांपूर्वी त्याने 'घाडगे & सून' या मालिकेत छोटीशी भूमिका केली होती. तसेच तो 'इश्काची नौका' या व्हिडिओ अल्बममध्ये दिसला होता. त्यानंतर आता तो आणखीन एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. 

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून या काळात गणपतींवरील नवीन गाणी व अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येतात. तसाच एक गणपती बाप्पावर आधारीत व्हिडिओ अल्बम लवकरच पाहायला मिळणार आहे. या अल्बमचे नाव आहे 'वक्रतुंड महाकाय' आणि या अल्बममध्ये दिसणार आहे ऋषी सक्सेना. या अल्बममधील गाणी नचिकेत जोग यांनी लिहिली असून त्याला स्वरसाज अवधूत गुप्ते व आदर्श शिंदेने दिला आहे. तर संगीत सुहित अभ्यंकरने दिले आहे. या व्हिडिओ अल्बमचे दिग्दर्शन सागरिका दासने केले आहे. या गाण्यात ऋषी सक्सेनासह रिचा अग्नीहोत्री व निरंजन जोशी दिसणार आहे. या गाण्याची निर्मिती विक्स बँडने केली आहे.

या गाण्याचा पोस्टर नुकताच ऋषीने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या पोस्टरवर तो मराठमोळ्या अंदाजात दिसतो आहे. हा अल्बम लवकरच प्रदर्शित होणार आहे. इश्काची नौका या अल्बमनंतर ऋषीचे चाहते त्याला नव्या अंदाजात पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.