समाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब: ‘हलाल’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 18:41 IST
मागील बऱ्याच दिवसांपासून तिहेरी तलाकचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील हाच मुद्दा ...
समाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब: ‘हलाल’
मागील बऱ्याच दिवसांपासून तिहेरी तलाकचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील हाच मुद्दा चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर घेऊन आले आहेत. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘हलाल’ चित्रपटात शिवाजी लोटण पाटील यांनी तिहेरी तलाकचा मुद्दा त्रिकोणी प्रेमकथेच्या माध्यमातून मांडला आहे. या चित्रपटाच्या टीमने अलिकडेच लोकमत आॅफिसला भेट दिली. लोटन पाटील यांनी ‘हलाल’ या आपल्या आगामी चित्रपटात याच ज्वलंत प्रश्नाला हात घातला आहे. राजन खान यांच्या ‘हलाल’ या कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे आणि प्रियदर्शन जाधव यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या कलाकारांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून तिहेरी तलाकचा मुद्दा अधोरेखित करताना पाटील यांनी त्रिकोणी प्रेमकथेची किनार जोडली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने चिन्मय, प्रितम आणि प्रियदर्शन प्रथमच एकत्र आले आहेत. हा चित्रपट राजन खान यांनी तीन तलाक व्यवस्थेवर लिहिलेली कथा आणि संशोधनातून समोर आलेल्या सत्यकथा यांच्यावर आधारित असून मुस्लिम समाजातील या अन्यायकारक प्रथेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये प्रदर्शित झाला असून अनेक पुरस्कार प्राप्त आहे. या चित्रपटाचे वैशिष्टय म्हणजे उच्च निर्मितीमूल्य, सशक्त आशय, कलाकारांची जमून आलेली भट्टी हे होय. चित्रपटाची गीते सुबोध पवार व सय्यद अख्तर यांनी लिहिली असून संगीताची जबाबदरी विजय गटलेवार यांनी सांभाळली आहे. याविषयी बोलताना अभिनेता अमोल कागणे म्हणाले की, ‘या अगोदर मी नाटकांची निर्मिती केली असून, अभिनयही केला आहे. याखेरीज चित्रपट आणि नाटकांशी निगडीत असलेली इतरही कामं केली आहेत. कॉलेजमध्ये शिकत असताना राजन खान यांची कथा वाचली होती. ती मला मनापासून आवडली. मध्यंतरीच्या काळात शिवाजी लोटन पाटील यांच्यासोबत ‘३१ डिसेंबर’ या हिंदी चित्रपटासाठी काम करताना या कथेवर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. मुस्लिम धर्मामध्ये आजही ‘हलाल’ हा जाचक नियम आहे. याचा मुस्लिम भगिनींना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचं त्यांच्याशी भेट घेतल्यावर जाणवलं आणि या कथेवर चित्रपट बनवण्याचा निर्धार केला.