प्रियांका चोप्राने केली ‘पाणी’ या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 12:20 IST
प्रियांका चोप्राच्या प्रोडक्शन हाऊस ‘पर्पल पेबल पिक्चर्स’ मार्फत ‘पाणी’ या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. सत्य घटनेवर ...
प्रियांका चोप्राने केली ‘पाणी’ या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा!
प्रियांका चोप्राच्या प्रोडक्शन हाऊस ‘पर्पल पेबल पिक्चर्स’ मार्फत ‘पाणी’ या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रथमच आदिनाथ कोठारे करत आहे. महाराष्ट्र सध्या पाणी प्रश्नाला सामोरे जात आहे. त्यामुळे हाच चित्रपटाचा धागा पकडून चौथ्या मराठी चित्रपटाची घोषणा झाली आहे. प्रादेशिक चित्रपटांना प्रोत्साहन देणे आणि नव्या टॅलेंटला संधी मिळवून देणे हा या चित्रपटामागील उद्देश आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा भागात नगदरवाडी येथील दुष्काळग्रस्त खेड्यात राहणाऱ्या एका सामान्य माणसाची ही कथा आहे. दुष्काळग्रस्त भागात राहणाऱ्या जनतेची पाण्यासाठी होणारी दैनंदिन व्यथा, त्यांचं घराबद्दलचं प्रेम रोजच्या जगण्यातला संघर्ष या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकणारी ही कथा आहे. या चित्रपटात आदिनाथ कोठारे, रूचा वैद्य, सुबोध भावे. किशोर कदम, गिरीष जोशी आणि रजित कपूर हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाविषयी प्रियांका चोप्रा म्हणते,‘प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही चांगल्या कथा, नवीन टॅलेंटला संधी देत असतो. असे अनेक लोक आहेत जे त्यांच्या दैनंदिन जीवनात प्रचंड संघर्ष करताना दिसतात. अशा सत्य घटनांना आम्ही जगासमोर आणू इच्छितो. खरंतर आम्ही अशा कथांच्या शोधातच असतो. पाणी या चित्रपटाची कथा ही खरंच चांगली असून आम्ही आदिनाथसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहोत.’ याअगोदर प्रोडक्शन हाऊसमार्फत व्हेंटीलेटर, काय रे रास्कला, फायरब्रँड यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.