बाबू बँड बाजाचा स्टार प्रवाहवर प्रिमियर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 20:07 IST
तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावून मराठी चित्रपटाचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर फडकावणाऱ्या ‘बाबू बँड बाजा’ हा चित्रपट आता प्रथमच टेलिव्हिजनवर पाहता ...
बाबू बँड बाजाचा स्टार प्रवाहवर प्रिमियर
तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावून मराठी चित्रपटाचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर फडकावणाऱ्या ‘बाबू बँड बाजा’ हा चित्रपट आता प्रथमच टेलिव्हिजनवर पाहता येणार आहे. रविवारी ४ मार्चला दुपारी एक आणि सायंकाळी सात वाजता या चित्रपटाचा स्टार प्रवाहवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. प्रेक्षकांना आपलेसे वाटेल असे विषय मांडण्याची पद्धत, कलाकारांनी जीव ओतून साकारलेल्या भूमिका यामुळे हा चित्रपट विशेष गाजला होता.राजेश पिंजानी दिग्दर्शित या चित्रपटात मिलिंद शिंदे, मिताली जगताप, विवेक चाबुकस्वार, नम्रता आवटे, संजय कुलकर्णी, राजेश भोसले आदी अभिनय संपन्न कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. शंतनू रोडे यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे.लिखाणात त्यांनी वापरलेले धक्का तंत्र हे या चित्रपटाचे वेगळेपण आहे. रोहित नागभिडे यांनी या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले आहे. अनेक महोत्सवांमध्ये या चित्रपटाचा विविध पुरस्कारांनी सन्मान झाला आहे. जन्म-मृत्यू पासून जीवनातल्या प्रत्येक प्रसंगाचा भाग असणाऱ्या, आपल्या सुरावटींनी लोकांना बेभान होऊन नाचायला लावणाऱ्या बँडवाल्यांची त्यांच्या जगण्याच्या संघर्षाची आशावादी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.संवेदनशील कथानक, उत्तम कलाकारांचा कसदार अभिनय या चित्रपटात पाहायला मिळेल. मिलिंद शिंदे, मिताली जगताप आणि विवेक चाबुकस्वार यांच्या नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांवर जादू केली होती. ही जादू प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाचा गौरव झाला होता. सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी मिताली जगताप, सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून विवेक चाबुकस्वार यांना बाबू बँड बाजा या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला होता. तसेच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचाही पुरस्कार ‘बाबू बँड बाजा’ने पटकावला होता. ग्रामीण जीवनाचा, बँडवाल्यांच्या आयुष्याचा पदर उलगडणारा, एक रसरशीत जीवनानुभव देणाऱ्या या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर स्टार प्रवाह या वाहिनीवर होत असल्याने या चित्रपटाची टीम सध्या चांगलीच खूश आहे. बाबू बँड बाजा या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर देखील चांगलेच यश मिळाले होते. या चित्रपटाचे कौतुक समीक्षकांसोबतच प्रेक्षकांनी देखील केले होते.