रवि जाधव दिग्दर्शित ‘न्यूड’ या मराठी चित्रपटाने न्यूयॉर्क चित्रपट महोत्सवात बाजी मारत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळविला आहे, तर याच चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाºया अभिनेत्री कल्याणी मुळे हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. ‘न्यूड’ला मिळालेल्या या सन्मानामुळे पुन्हा एकदा मराठीचा झेंडा सातासमुद्रापार फडकला आहे. विशेष म्हणजे, या महोत्सवाचे उद्घाटन ‘न्यूड’ या चित्रपटानेच करण्यात आले होते.
दरम्यान, १८ वा न्यूयॉर्क चित्रपट महोत्सव अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या विलेज ईस्ट सिनेमा येथे ७ ते १२ मे दरम्यान पार पडला. या महोत्सवाचा समारोप अभिनेता राजकुमार रावच्या ‘ओमेर्ता’ या चित्रपटाने झाला. 'बेलेकॅम्पा, ज्यूझ, लाईट इन द रूम, टेक आॅफ' या विदेशी चित्रपटांना धोबीपछाड देत मराठीच्या ‘न्यूड’ने बाजी मारली. या महोत्सवात ‘न्यूड’ला दोन नामांकने होती. त्या दोन्ही नामांकनांमध्ये चित्रपटाने पुरस्कार मिळविले आहेत.
गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काही मराठी सिनेमांना एंट्री देण्यात आली होती. त्यात ‘न्यूड’ला एंट्री देऊन नंतर प्रवेश नाकारला होता. त्यानंतर बराच वादही निर्माण झाला होता. त्याचबरोबर चित्रपटाच्या प्रदर्शनालाही विरोध केला गेला. मात्र अशातही चित्रपटाने त्याचे महत्त्व पटवून दिले आहे. नग्न चित्रकलेसाठी मॉडेल बनणाºया स्त्रियांच्या आयुष्याभोवती या चित्रपटाची कथा फिरते. कल्याणी मुळे, छाया कदम आणि मदन देवधर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.