निलेश बोरसे सांगतोय, बंदुक्याने खूप काही शिकवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 13:07 IST
अभिनेता निलेश बोरसेने मराठी चित्रपट सृष्टीत आगमन केले आहे. बंदूक्या सिनेमात 'आवल्या' ही भूमिका साकारणाऱ्या निलेशची पार्श्वभूमी खूपच रंजक ...
निलेश बोरसे सांगतोय, बंदुक्याने खूप काही शिकवले
अभिनेता निलेश बोरसेने मराठी चित्रपट सृष्टीत आगमन केले आहे. बंदूक्या सिनेमात 'आवल्या' ही भूमिका साकारणाऱ्या निलेशची पार्श्वभूमी खूपच रंजक आहे. तो मुळात अभियांत्रिकीचा विद्यार्थी असून त्याचे पदव्यूत्तर शिक्षण एम.बी.ए मार्केटिंगमध्ये झालंय. पण निलेशला अभिनय क्षेत्राची आवड असल्याने तो या क्षेत्रात येण्यासाठी धडपड करत होता. त्याचा निर्णय क्षणिक नव्हता, त्यासाठी त्याने जवळपास शिक्षणानंतरची मोक्याची चार वर्षं दिली. याबद्द्ल निलेश सांगतो, कॉलेजमध्ये असल्यापासूनच अभिनयाबद्दल खूप अप्रूप वाटायचं. आपली आवड मनापासून जपायची या उद्देशाने मी लहान मोठ्या अभिनय कार्यशाळांमध्ये सहभागी होऊ लागलो. त्याच दरम्यान राहुल मनोहर चौधरी सरांच्या कार्यशाळेत जाण्याची संधी मिळाली आणि तोच माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. माझ्या कोऱ्या पाटीवर राहुल सरांनी अभिनयाची बाराखडी लिहिली. त्यांच्या बऱ्याच कार्यशाळांमध्ये मी सहभागी होत गेलो. त्यांच्या सोबत प्रायोगिक नाटकं केली, त्यातील 'लास्ट लव्ह स्टोरी' या नाटकाला २०१४ मध्ये झी गौरव पुरस्कारात नामांकन मिळालं होतं. या नाटकाची नोंद राज्यस्तरीय स्पर्धेतही घेतली गेली. राहुल सर लिखित आणि दिग्दर्शित 'लग्नाची ऐशी तैशी', गाढवाचं लग्न या व्यावसायिक नाटकांतही कामं केली. अभिनयाचे धडे गिरवत असतानाच मराठी सिनेमा करायचे ठरले. बंदुक्याच्या चित्रीकरण्याच्या दरम्यान शशांक शेंडे सर आणि नामदेव मुरकुटेंजीकडून खूप मार्गदर्शन मिळाले आणि आमचे छान त्रिकुट जमून आले. वर्षा सिनेव्हिजन अंतर्गत राहुल मनोहर चौधरी दिग्दर्शित 'बंदूक्या' सिनेमात 'आवल्या' ही भूमिका मी साकारली आहे. १ सप्टेंबर २०१७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या 'बंदूक्या' सिनेमातील 'आवल्या' एकदम अवलिया आहे. आवल्या साकारण्यासाठी मी पाटी कोरी ठेवूनच दिग्दर्शका पुढे गेलो. 'आवल्या' साठी माझा खऱ्या अर्थाने मेकओव्हर झाला. आदिवासी पाड्यात राहणारा आवल्या हा शांत, सौम्य स्वभावाचा कुठेही आक्रमकता नाही असा आहे. दिसायला धष्ट-पुष्ट थोडासा गव्हाळ रंगाचा आहे. ज्यासाठी मी काहीसं वजनही वाढवलं, केस छोटे केले. नाशिक आणि गुजरात सीमाभागातील आदिवासी पाड्यांमध्ये डिसेंबर महिन्याच्या गोठवणाऱ्या थंडीत सिनेमाचं चित्रीकरण झालं. सिनेमा तयार होण्याच्या प्रत्येक गोष्टीत मी सहभागी असल्याने शुटींग लोकेशन्स शोधणं, पाड्यावरील लोकांचं राहणीमान समजून घेणं हे सगळेच मी केले. तसेच त्यांची भाषा अवगत करण्यासाठी जवळपास तीन महिने एकप्रकारची तालीमच केली. थोडक्यात काय, माझी भूमिका साकारण्यासाठी सटल फ्रेमध्ये वर्किंग कसं करायचं हे 'बंदूक्या'च्या निमित्ताने समजलं.Also Read : अतिशा नाईक आणि शशांक शेंडे यांचा बंदूक्या