Join us  

खट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत निखिल राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 6:20 AM

सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा 'गुणी अभिनेता ' अशी ओळख असणाऱ्या निखिल राऊत ची प्रमुख भूमिका असणारं 'चॅलेंज'  ...

सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा 'गुणी अभिनेता ' अशी ओळख असणाऱ्या निखिल राऊत ची प्रमुख भूमिका असणारं 'चॅलेंज'  हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजतय.ज्यात निखिल 'स्वातंत्र्यवीर सावरकरांची' भूमिका करतोय त्याच्या ह्या भूमिकेचं प्रचंड कौतुक होताना दिसतय.आता तो आणखी एका भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झालाय परंतू रंगभूमीवर नव्हे तर मोठ्या पडद्यावर.लवकरच निखिल एका ऐतिहासिक भूमिकेत आपल्या चाहत्यांना भेटणार आहे. ‘फर्जंद’ या आगामी मराठी सिनेमात निखिलने हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीत छत्रपती शिवाजी महाराजांना अनमोल सहकार्य करीत हेरगिरीचं काम अगदी बेमालूमपणे करणाऱ्या गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्या साथीदार खबऱ्याची 'किसनाची 'भूमिका साकारली आहे.तो गुप्तहेर असल्यामुळे संपूर्ण चित्रपटात वेगवेगळ्या रुपात दिसणार आहे.भूमिकेतलं वैविध्य इथेही जपत निखिलने ह्या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली  आहे. नुकतेच त्याने ह्या चित्रपटाचं पोस्टर सोशल मिडियावर शेअर केले आहे.त्यामुळे निखिल च्या भूमिकेविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. १ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘फर्जंद’चं लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर या नवोदित दिग्दर्शकाने केलं असून निर्मिती अनिरबान सरकार यांनी केली आहे. ‘स्वामी समर्थ मुव्हीज’ची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचे सहनिर्माते संदिप जाधव, महेश जाऊरकर आणि स्वप्निल पोतदार आहेत. ‘फर्जंद’ युद्धपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. यामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार? पोस्टरमध्ये दिसणारा बलदंड शरीरयष्टीचा तो युवक नेमका कोण? असे असंख्य प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. या सारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे चित्रपटाच्या पहिल्या टीझर मधून प्रेक्षकांना मिळाली आहेत. शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असलेला अभिनेता चिन्मय मांडलेकर तसेच रांगड्या युवकाची झलक प्रेक्षकांना पहिल्या टीझर मधून पहायला मिळाली असून अल्पावधीतच या टीझरने कमाल केली आहे. या टीझरचे हिट्स सातत्याने वाढत असून प्रेक्षकांच्या पसंतीची पावती टीझरला मिळाली आहे. ‘कोंडाजी फर्जंद’ आणि मावळ्यांनी किल्ले पन्हाळ्यावर यशस्वी चढाई केली होती या धाडसाची गाथा, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘फर्जंद’ या चित्रपटाद्वारे उलगडली जाणार असून आपणास पुन्हा एकदा इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. मराठीतील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये आहेत.