Join us  

नवीन वर्षात ही मराठमोळी अभिनेत्री अडकतेय लग्नबेडीत, समोर आला मेहंदी सेरेमनीचा व्हिडीओ

By तेजल गावडे | Published: January 04, 2021 1:09 PM

नवीन वर्षात मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहताना दिसणार आहे.

नवीन वर्षाला नुकतीच सुरूवात झाली आहे आणि या वर्षात मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहताना दिसणार आहे. तर या वर्षात सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक, अभिज्ञा भावे, सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर हे कलाकार लग्नबेडीत अडकणार आहे. तर अभिज्ञा भावेचा नुकताच मेहंदी सेरेमनीचा व्हिडीओ समोर आला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

अभिज्ञा भावेचा मेहंदी सेरेमनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पहायला मिळतो आहे. या व्हिडीओत अभिज्ञाने पिवळ्या रंगाचा टॉप आणि गुलाबी रंगाचा लेहंगा घातलेला दिसतो आहे. फुलांचे दागिने तिने परिधान केले आहे. या व्हिडीओत तिच्या हाता व पायावर मेहंदी काढत असल्याचे पहायला मिळत आहे. अभिज्ञाच्या या व्हिडीओवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अभिज्ञा भावे लवकरच मेहूल पैसोबत बोहल्यावर चढताना दिसणार आहे. 

अभिज्ञा भावेचा मेहूल पैसोबत ऑक्टोबरमध्ये साखरपुडा पार पडला आहे. अभिज्ञाने 'माझा साखरकारखाना' असे कॅप्शन देत साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. मराठी सेलिब्रेटीं आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. कुटुंबीयांच्या उपस्थित अभिज्ञाचा साखरपुडा पार पडला होता.

अभिज्ञाच्या होणाऱ्या पतीचे नाव मेहूल पै आहे. मेहुल पै मुळचा मुंबईचा असून गेल्या १२ वर्षांपासून 'क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड'मध्ये तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.यातून इव्हेंट मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंगची जबाबदारी तो सांभाळतो आहे.

तुला पाहते रे मालिकेतील मायराच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे सोशल मीडियावर सक्रीय असते.फार कमी लोकांना माहित आहे की चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिज्ञा एअरहॉस्टेस होती. २०१४ साली ती वरूण वैटिकर यांच्यासोबत विवाहबद्ध झाली होती. मात्र काही कारणास्तव नंतर ती विभक्त झाली.

२०१० साली 'प्यार की ये एक कहाणी' या हिंदी मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. अभिज्ञाच्या मुव्हिंग आऊट या वेबसीरिजला देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर नुकताच त्याचा दुसरा सीझनदेखील प्रदर्शित झाला होता. सध्या ती रंग माझा वेगळा मालिकेत पहायला मिळते आहे.

टॅग्स :अभिज्ञा भावे