Join us  

सद्सद्विवेक बुद्धीला साद घालणारा राष्ट्रीय लघुचित्रपट 'मयत'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 9:26 AM

प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा पापमार्गाने न जाता अंतर्मुख होऊन स्वतःमध्ये असलेल्या सद्सद्विवेक बुद्धीला साद घातली तर जगण्याचा नवा पर्याय उपलब्ध ...

प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा पापमार्गाने न जाता अंतर्मुख होऊन स्वतःमध्ये असलेल्या सद्सद्विवेक बुद्धीला साद घातली तर जगण्याचा नवा पर्याय उपलब्ध होऊ शकतो असा संदेश डॉ. सुयश शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला 'मयत' हा लघुपट देऊन जातो. अलीकडेच 'मयत' लघुपटाला ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून गौरविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जयपूर फिल्म फेस्टिवल मध्ये देखील  इंटरनॅशनल पॅनोरमा विभागात सादर होणाऱ्या चित्रपटांमध्ये 'मयत' लघुपटाला सर्वोत्कृष्ट स्क्रिप्टचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.ही कथा आहे एका खेड्यात मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या नामदेव याची. मोलमजुरी करण्यासाठी अनेक ठिकाणी चकरा मारूनही त्याला काम मिळत नाही. घरात खायला अन्नाचा कण नाही. अशा परिस्थितीत त्याला मयताच्या अंतयात्रेच्यावेळी टाकण्यात येणारे पैसे गोळा करण्यातून उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त होते. अशी वेगळे कथाबीज घेऊन डॉ. सुयश शिंदे यांनी ही कथा पडद्यावर फुलवली आहे.  या लघुचित्रपटाबद्दल बोलताना डॉ. सुयश शिंदे म्हणाले, "'मयत' लघुपट हा पूर्णपणे व्यावसायिक सेटअप वापरून तयार केलेला आहे. जवळपास दीड वर्षांपासून 'मयत' लघुपटावर काम चालू होते. सर्वसाधारणपणे कोणताही लघुचित्रपट तत्कालीन समस्येवर सामाजिक संदेश देतो. त्यामधून लोकजागृती करणे हा उद्देश असतो. मात्र या संकल्पनेला छेद देत मी प्रेक्षकांना माझ्या चित्रपटातून तात्विक संदेश देण्याचे ठरवले. त्यामुळे 'मयत' हा लघुपट प्रेक्षकांना अंतर्मुख करून जगण्याचे तत्वज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. या लघुचित्रपटाच्या स्क्रिप्टवर पाच-सहा महिने काम चालू होते. या लघुचित्रपटाच्या लोकेशनसाठी सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रवास करून चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारी लोकेशन निवडण्यात आली. कॅमेरामन गिरीश जांभळीकर यांनी प्रत्येक लोकेशनला आपल्या फ्रेममध्ये सुंदर रीतीने दाखवल्यामुळे छायाचित्रणातूनही लघुपट व्यक्त होतो. इतर तांत्रिक बाजू संभाळणाऱ्यांमध्ये विपुल कदम (संकलन), सायली कुलकर्णी (ध्वनी), संगीत (गंधार) यांच्या कामगिरीने चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. या लघुपटाचे सलग सहा दिवस चित्रीकरण सुरु होते. चित्रीकरणासाठी स्थानिक गावकऱ्यांनी देखील खूप सहकार्य केले. त्यानंतर पोस्ट प्रॉडक्शनची तीन ते चार महिने लागले" या सगळ्या टीमने केलेल्या कष्टाचे फळ मिळाले असल्याचे डॉ. शिंदे यांनी नमूद केले.  डॉ. सुयश शिंदे यांनी हा लघुचित्रपट अतिशय सुरेख दिग्दर्शित केला आहे. काही दृष्यामधून त्यांच्यातील कल्पक दिग्दर्शक दिसून येतो. नामदेवची भूमिका केलेल्या कैलास वाघमारे यांनी आपल्या भावमुद्रेवरून ही भूमिका जिवंत केली आहे. मीनाक्षी राठोड यांनी त्याच्या पत्नीची भूमिका समरसून केली आहे. इतर भूमिकांमध्ये नामदेवची मुलगी (सुरभी) आणि अन्य कलाकारांनी उत्तम साथ दिली आहे. लघुचित्रपटाचा प्रत्येक कॅनव्हास लक्षवेधी झालेला आहे.राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेला दिग्दर्शक डॉ. सुयश शिंदे यांचा हा सलग तिसरा लघुचित्रपट.  यापूर्वी २०१६ मध्ये स्वच्छ भारत फिल्म फेस्टिवलमध्ये देशभरातून ३ मिनिटांचे लघुचित्रपट मागविण्यात आले होते. ४५०० चित्रपटांमधून डॉ. शिंदे यांनी तयार केलेल्या 'शेल्फी' या लघुचित्रपटाला तिसरा क्रमांक मिळाला होता. २०१७ मध्ये केंद्रीय सामाजिक न्याय व कल्याण खात्याने दिव्यांगजन सशक्तीकरण फिल्म फेस्टिवल आयोजित केला होता. त्यामध्ये डॉ. सुयश शिंदे यांनी तयार केलेल्या 'अजान' लघुचित्रपटाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले होते. आणि आता २०१८ मध्ये 'मयत' चित्रपटाला ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट लघुचित्रपट म्हणून गौरविण्यात आले आहे.  डॉ. सुयश शिंदे हे व्यवसायाने दंतवैद्य असून ते मूळचे सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील चौधरवाडी गावचे. त्यांना अभिनय आणि दिग्दर्शनाची आवड असून पुण्यात वैद्यकीय शिक्षणासाठी महाविद्यालयात असताना पुरुषोत्तम करंडक, सकाळ करंडक अशा एकांकिका स्पर्धेतून त्यांनी भाग घेतला आहे. डॉ. शिंदे यांनी 'देऊळ' या मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्याबरोबर काम केले आहे. आगामी काळात एक डार्क कॉमेडी असलेला लघुचित्रपट बनविण्याचा डॉ. शिंदे यांचा मानस आहे.