Join us  

​राष्ट्रीय पुरस्कार विजेता रिंगण प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2017 6:16 AM

२००७ साली पाच मित्रांचा झालेला छोटासा संवाद आज 'रिंगण' या कलाकृतीच्या निमित्ताने जणू चर्चेचा विषयच ठरलेला आहे. विठ्ठल पाटील, ...

२००७ साली पाच मित्रांचा झालेला छोटासा संवाद आज 'रिंगण' या कलाकृतीच्या निमित्ताने जणू चर्चेचा विषयच ठरलेला आहे. विठ्ठल पाटील, गणेश फुके, महेश येवले, योगेश निकम आणि मकरंद माने या पाच मित्रांनी मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे. 'रिंगण' हा सिनेमा येत्या ३० जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून मैत्री, प्रेम, कुटुंब यांसारख्या विषयांना हात घालून बाप आणि मुलाचे अबोल पण प्रत्यक्षात बरेच काही सांगून जाणारे नाते यात दाखवले आहे. असा वेगळा विषय हाताळताना आलेल्या अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार जिंकून भारतीय चित्रपटसृष्टीत 'रिंगण'चं नाव सोनेरी अक्षरात कोरले आहे.'रिंगण' म्हणजे एका हतबल झालेल्या पण तरीही आपल्या मुलावरील प्रेमाखातर स्वतःला थांबू न देता जिद्दीने सतत प्रयत्न करत राहणाऱ्या बापाची हृदयस्पर्शी कहाणी ७० एम एमच्या पडद्यावर दिग्दर्शक मकरंद माने यांनी अगदी सहज मांडली आहे. मकरंद माने यांनीच या सिनेमाची कथा लिहिली असून 'रिंगण' सिनेमाद्वारे त्यांनी दिगदर्शक म्हणून यशस्वीरित्या सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.सुरुवातीच्या काळात चित्रपटाला कोणत्याही निर्मात्याने पाठिंबा न दिल्याने विठ्ठल पाटील, गणेश फुके, महेश येवले, योगेश निकम, मकरंद माने या मित्रांनी जिद्दीने स्वबळावर या चित्रपटाची निर्मिती केली आहे. एका मित्राचे सिनेमा बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेली इतर मित्रांची तडजोड जणू 'रिंगण' सिनेमाच्या पडद्यामागची कहाणी स्पष्ट करते. दरम्यान सिनेमा प्रस्तुत करण्यासाठी त्यांना लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल यांची विशेष साथ लाभली.