Join us  

द सायलेंस या चित्रपटामुळे माझी एक मोठी इच्छा पूर्ण झालीः अंजली पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2017 9:53 AM

'न्यूटन' आणि 'चक्रव्यूह' सारख्या दर्जेदार सिनेमांसाठी वाह! वाह! मिळवणारी अभिनेत्री अंजली पाटील 'द सायलेंस' चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पहिले ...

'न्यूटन' आणि 'चक्रव्यूह' सारख्या दर्जेदार सिनेमांसाठी वाह! वाह! मिळवणारी अभिनेत्री अंजली पाटील 'द सायलेंस' चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पहिले पाऊल ठेवत आहे. अंजली पाटील आणि नागराज मंजुळे यांच्यासोबतच या चित्रपटात रघुवीर यादव, मुग्धा चाफेकर, कादंबरी कदम आणि बालकलाकार वेदश्री महाजन महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.इफ्फी, बंगळूरू, मुंबई, पुणे आणि कलकत्त्याबरोबरच जर्मनी, अमेरिका, ब्राझील, स्पेन, टांझानिया, चेक प्रजासत्ताक आणि बांग्लादेशसारख्या 35 हून अधिक नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये हजेरी लावून दोन महाराष्ट्र राज्य पुरस्कारांबरोबर एकूण पंधरा पुरस्कारांवर नाव कोरलेला ‘द सायलेंस’ हा चित्रपट प्रदर्शनास सज्ज झाला आहे. यानिमित्ताने अंजलीशी मारलेल्या खास गप्पा :हल्लीच तुझा न्यूटन हा सिनेमा ऑस्करला गेला तर तुझ्या 'द सायलेंस' चित्रपटाचीही खूप चर्चा आहे. याआधी केलेल्या चित्रपटांसाठी तुला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. सिनेसृष्टीत तुला मिळालेल्या यशाबद्दल काय सांगशील?अर्थात, इतरांसारखं यश मलाही आनंद देऊन जातं. पण आयुष्य एवढ्याच गोष्टींवर अवलंबून नसल्याचे गेल्या काही वर्षात मला जाणवले आहे. मी बरेच चढउतार माझ्या आयुष्यात अनुभवले आहेत. त्यामुळे पुरस्कार, बॉक्स ऑफिसवर जमवलेला गल्ला किंवा एखादा हिट चित्रपट या सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी दुय्यम आहेत. मी एक कलाकार म्हणून नेहमीच भूमिकेतून आंतरिक समाधान मिळवण्याचा प्रयत्न करते, जे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.तुझ्या 'द सायलेंस' या चित्रपटाविषयी काय सांगशील?आपण समाजात राहात असताना ज्या गोष्टींवर बोलणं टाळतो. 'द सायलेंस' त्याच बाबींवर भाष्य करतो. बाल शोषण आणि घरगुती हिंसा हा याचा विषय आहे. या चित्रपटाच्या निर्मात्या अश्विनी सिधवानी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठीमध्ये प्रदर्शित होणार आहे.वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट करताना काय वेगळेपण जाणवते?मी एक महाराष्ट्रीयन आहे. त्यामुळे 'द सायलेंस' चित्रपटात काम करणे काही कठीण नव्हते आणि तसे बघायला गेले तर प्रत्येक चित्रपटाच्या सेटवरचे वातावरण वेगळे असते. त्यामुळे प्रत्येक चित्रपटाचा अनुभव वेगळा असतो. अर्थात मराठी चित्रपटाच्या सेटवरचे वातावरण पारिवारीक असतं. सेटवरच्या वातावरणापेक्षा माझी भूमिका, कथा आणि दिग्दर्शक काय सांगतात याकडे माझे जास्त लक्ष असते.एखादा चित्रपट निवडताना तू कोणत्या बाबींचा विचार करतेस?चित्रपटाची कथा, दिग्दर्शकाचा दृष्टिकोन, चित्रपट बनवणाऱ्यांची महत्त्वाकांक्षा आणि माझी भूमिका या गोष्टींकडे मी प्रामुख्याने लक्ष देते. 'द सायलेंस' चित्रपटाच्या निमित्ताने या सगळ्याच गोष्टी जुळून आल्या असून माझी नागराज बरोबर काम करण्याची इच्छाही पूर्ण झाली. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अश्विनी आणि गजेंद्र यांच्या बरोबर काम करण्याचा अनुभव ही सुरेख होता.Also Read : ‘अंजूला सगळं मिळालं आता फक्त आॅस्कर हवा’, नाशिकगर्ल अंजली पाटीलच्या आईची भावना!