Join us  

‘संगीत म्हणजे माझ्यासाठी जीवन’ - अवधूत गुप्ते

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2017 1:17 PM

मराठी इंडस्ट्रीत गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून संगीतकार, गायक, दिग्दर्शक, निर्माता अशा भूमिकांमध्ये लीलया वावरणारा कलाकार म्हणजे अवधूत गुप्ते. ...

मराठी इंडस्ट्रीत गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून संगीतकार, गायक, दिग्दर्शक, निर्माता अशा भूमिकांमध्ये लीलया वावरणारा कलाकार म्हणजे अवधूत गुप्ते. गीत-संगीत, अल्बम आणि गाणी यांमध्ये अव्वल कामगिरी करणारा अवधूत आता लवकरच कलर्स मराठीवर सुरू होणाऱ्या  ‘कॉमेडीची GST एक्सप्रेस’ या विनोदी कार्यक्रमातून प्रथम प्रेक्षक या भूमिकेत दिसणार आहे. आत्तापर्यंतच्या त्याच्या कारकिर्दीविषयी आणि नव्या इनिंगबद्दल मारलेल्या या गप्पा...* ‘कॉमेडीची GST एक्सप्रेस’ मध्ये तू मार्गदर्शक पण नाही आणि परीक्षकही नाही. मग नेमका काय असणार तुझा रोल?-  मी प्रथम प्रेक्षक  म्हणून या कार्यक्रमात दिसणार आहे. कमेंट्स देणं मला चांगलं जमतं, असं सर्वसामान्य प्रेक्षकांचं मत आहे. म्हणून मी स्किट कसं झालं, हे परीक्षकांप्रमाणे सांगणार नाही किंवा  त्यांना गुण देखील देणार नाही. केवळ एक प्रेक्षक म्हणून मला हे स्किट कसं वाटलं, मी किती हसलो हे सांगणार आहे.* या तुझ्या नव्या इनिंगसाठी तू कोणती खास तयारी केली आहेस?- मला नवीन काहीही करायचं नाहीये. मला शोवर केवळ मनमुराद हसायचं आहे. स्किटवर मन आणि लक्ष केंद्रित करून हसून दाद द्यायची आहे. यासाठी कुठल्याही तयारीची खरंतर गरज नाही. त्यामुळे ‘जीएसटी’ हा नव्या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम असून प्रेक्षकांच  टेन्शन दूर करण्यासाठी आम्ही आलो आहोत.* सध्या गायन-डान्सिंगचे अनेक रिअ‍ॅलिटी शोज सुरू आहेत. तुला काय वाटतं की, यामुळे नवोदितांना कितपत संधी मिळते?- सध्या सुरू असलेल्या गायन-डान्स आधारित रिअ‍ॅलिटी शोमुळे नवोदित कलाकारांना संधी मिळते. मला देखील मिळाली होती. १९९७ यावर्षी मी ‘झी सारेगामापा’ चा विजेता होतो. मला संधी मिळत गेली. मिळालेल्या संधीचं मी सोनं करत गेलो. या शोजमुळे खरं टॅलेंट समोर येतं, कमकुवत असणारं बाजूला राहतं. स्पर्धा म्हटल्यावर हे होणारच आणि व्हायला हवं.* तुझा ‘पाऊस’ हा म्युझिक अल्बम रिलीज झाल्यानंतरचा अवधूत गुप्ते आणि आजचा तू काय वाटते मागे वळून पाहताना?- चांगलं वाटतंय. खरंतर सगळ्यांचाच एक स्ट्रगल पिरियड असतो. या पिरीयडमध्येही एक मजा असते. रसिकांनी माझ्यावर खुप प्रेम केलं. मी इंडस्ट्रीत असलेल्या प्रत्येक भूमिका करून पाहिल्या आहेत. मी दिग्दर्शक, निर्माता, गायक, संगीतकार, प्रेझेंटर म्हणून समोर आलो. आजही घोडदौड सुरूच आहे. मायबाप प्रेक्षकांच्या आशीर्वादाने, साथीने नक्कीच चांगलं करत राहण्याचा प्रयत्न करतो आहे. * मराठी चित्रपटातून सध्या वेगवेगळे गाणी-संगीताचे प्रयोग केले जात आहेत. या प्रयोगांबद्दल तुला काय वाटते?- सध्या इंडस्ट्रीत चांगले प्रयोग होत आहेत. नवीन संगीतकार येत आहेत. नवा ट्रेंड येतो आहे. गाणी-संगीतामध्ये बदल असणं गरजेचं आहे. खरंतर माझी सुरूवात जेव्हा झाली होती तेव्हा मी जेवढो गाणी गात नव्हतो, तेवढी मी आता गातो आहे. सध्या चर्चेत असलेल्या मराठी चित्रपटांमध्ये मी गायलेलीच गाणी आहेत. नवीन शिकायला मिळते आहे. त्यामुळे मला या नव्या ट्रेंडचा आनंद आहे.* संगीत तुझ्यासाठी काय आहे? आणि तू कुणाला प्रेरणास्थानी मानतोस?- संगीत माझ्यासाठी जीवन आहे. संगीतकार म्हणून मी पंचमदा आणि राहूल देव बर्मन यांना फॉलो करतो. तर गायक म्हणून मी किशोर कुमार यांना प्रेरणास्थानी मानतो. * तू आत्तापर्यंतच्या अनेक शोजमधून परीक्षकाच्या भूमिकेत दिसला आहेस. तुझ्या ‘तोडलंस मित्रा’,‘टांगा पलटी घोडे फरार’ ह्या प्रतिक्रियांना आम्ही मिस करतोय. या तुझ्या युनिकनेसबद्दल काय सांगशील?- खरंतर तो माझ्या पर्सनॅलिटीचा भाग आहे. माझं शिक्षण मुंबईतलं असलं तरीही माझे आचार-विचार सगळं काही कोल्हापूरचंच आहे. या माझ्या पर्सनॅलिटीमुळे मी चाहत्यांचा लाडका झालो आहे, यातच माझं खरं यश असून तसंच राहणं, बोलणं, वागणं आता मला जास्त आवडतं. * दिग्दर्शक, गायक, संगीतकार, निर्माता, लिरिसिस्ट, सुत्रसंचालक या सर्व पातळ्यांमध्ये तू काम केले आहेस. नेमक्या कोणत्या प्रकारात काम करायला तुला जास्त आवडतं?-  सगळया प्रकारांमध्ये काम करायला मला जास्त आवडतं.  खरंतर मी या सर्व प्रकारांना माझं बाळ समजतो. पण ते काय आहे ना? सगळयांत लहान बाळाचे जास्त लाड होतात ना..तसंच मी  प्रेझेंटर किंवा प्रस्तुतकर्ता म्हणून वावरायला जास्त आवडतंय. * तुझ्या आगामी प्रोजेक्टसबद्दल काय सांगशील?- सध्या तरी मी शोवर लक्षकेंद्रित करतो आहे. यानंतर माझा एक चित्रपट येणार असून त्यात मी एक प्रेझेंटर म्हणून दिसणार आहे. सध्या तरी या दोन बाबींकडेच माझे लक्ष लागून राहिले आहे.