Join us  

#MeToo: अत्याचार करणाऱ्या खलनायकांचा चेहरा समोर आणला पाहिजे - सोनाली कुलकर्णी

By तेजल गावडे | Published: October 22, 2018 7:01 PM

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मीटू मोहिमेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ठळक मुद्दे मोहिमेमुळे भारतातल्या सगळ्या स्त्रियांना आवाज मिळाला - सोनाली कुलकर्णी

हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या काही दिवसांपासून मीटू मोहिमेअंतर्गत दरदिवशी आपल्यावर झालेल्या अन्याय आणि अत्याचारांना सोशल मीडिया किंवा माध्यमातून वाचा फोडत आहेत. या आरोपांनंतर चित्रपटृष्टीतले वातावरण पूर्णपणे ढवळून गेले आहे. झालेल्या आरोपांमध्ये नवनवीन गौप्यस्फोट किंवा मग नवा आरोप यामुळे चित्रपटसृष्टीला जणू काही मीटूचे ग्रहण लागल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मीटू मोहिमेला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पाठिंबा दर्शविला आहे. तिने ही मोहीम फक्त सिनेसृष्टीपुरतीच मर्यादीत न राहता कुटुंब व नातेवाईकांमध्ये घडत असलेले अत्याचार समोर आले पाहिजेत, असे सांगितले.

सोनाली कुलकर्णीचा आगामी चित्रपट 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. त्यावेळी ती बोलत होती.

सोनाली कुलकर्णीने मीटू मोहिमेबद्दल सांगितले की, 'मला स्वतःला असे वाटते की या मोहिमेमुळे भारतातल्या सगळ्या स्त्रियांना आवाज मिळाला आहे. तो फार महत्त्वाचा आहे आणि हा आवाज फक्त चित्रपटसृष्टीपुरता मर्यादीत न राहता जेव्हा घराघरात पोहचला पाहिजे. ज्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये व नातेवाईकांमध्ये घडत असलेले छुपे अत्याचार करणारे खलनायक जगासमोर येतील.पुरूष जात वाईट आहे, असे म्हणणे फार चुकीचे आहे. पण, त्रास देणारी माणसे व त्यांचा होणारा त्रास आपण थांबवलाच पाहिजे. त्यासाठी कुणी बोलू बघतोय, त्या प्रत्येक आवाजाला मला शाबासकी व धीर द्यावासा वाटतो आहे. '

टॅग्स :सोनाली कुलकर्णीमीटू