Join us  

मराठमोळी अभिनेत्री उमा भेंडे यांची सून देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 7:00 AM

मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेली सोज्वळ आणि तितकीच देखणी अभिनेत्री म्हणून उमा भेंडे हे नाव आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे.

मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेली सोज्वळ आणि तितकीच देखणी अभिनेत्री म्हणून उमा भेंडे हे नाव आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे. खरेतर उमा हे नाव त्यांना लता दिदींनीच दिले होते त्यांचे मूळ नाव होते अनसूया साकरीकर.

मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या उमा भेंडे यांनी १९६० सालच्या आकाशगंगा चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मधुचंद्र, आम्ही जातो अमुच्या गावा, दोस्ती, काका मला वाचवा, भालू, स्वयंवर झाले सीतेचे या आणि अशा तमिळ, तेलगू, छत्तीसगडी चित्रपटात त्यांनी काम केले होते. 

मराठी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांच्याशी उमा यांनी विवाह केला. ‘नाते जडले दोन जीवांचे’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर त्यांनी लग्न केले. ‘श्री प्रसाद चित्र’ ही त्यांची निर्मिती संस्था, यातून त्यांनी भालू, प्रेमासाठी वाट्टेल ते, चटकचांदनी अशा चित्रपटांची निर्मिती केली. १९ जुलै २०१७ रोजी उमा भेंडे यांचे निधन झाले.

उमा आणि प्रकाश भेंडे यांना प्रसाद आणि प्रसन्न ही दोन मुले आहेत. प्रसाद भेंडे हा त्यांचा थोरला मुलगा. प्रसाद भेंडे हा मराठी सृष्टीत सिनेमॅटोग्राफर म्हणून काम सांभाळतो आहे.

“दुनियादारी” हा त्याचा पहिलाच चित्रपट खूपच यशस्वी झाला. या चित्रपटामुळे त्याला अनेक पुरस्कार मिळाले. लोकमान्य, मितवा, वेलकम जिंदगी, प्यारवाली लव्हस्टोरी, मला काहीच प्रॉब्लेम नाही, सविता दामोदर परांजपे, बेफाम, सातारचा सलमान या गाजलेल्या चित्रपटासाठी त्याने काम केले आहे. लोकमान्य चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर म्हणून सन्मानित करण्यात आले होते.

हिंदी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता महाडिक भेंडे ही प्रसादची पत्नी आहे.प्रसाद आणि श्वेताला एक मुलगा आहे. ज्याचे नाव अभिर आहे.  

गुड्डन तुमसे ना हो पायेगा, कृष्णदासी, एक श्रीनगर स्वाभिमान अशा हिंदी मालिकेत तिने काम केले आहे. श्वेताने लोकमान्य-एक युगपुरुष या मराठी चित्रपटातही महत्वपूर्ण भूमिका साकारली होती.

तर प्रसन्न भेंडे हा उमा आणि प्रकाश भेंडे यांचा धाकटा मुलगा आहे. किमया भेंडे हे प्रसन्नच्या पत्नीचे आणि उमा भेंडे यांच्या धाकट्या सुनेचे नाव. प्रसन्न आणि किमया हे दोघेही ‘Roger that production’ ही निर्मिती संस्था सांभाळत आहेत.

टॅग्स :लोकमान्य टिळक