Join us  

मराठी प्रेक्षक सर्वाधिक प्रगल्भ : अमेय वाघ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 4:59 PM

सतीश डोंगरेमराठीत वेगवेगळे प्रयोग करून उत्तम कलाकृती असलेले चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचविले जात आहेत. खरं तर मराठी प्रेक्षक सर्वाधिक ...

सतीश डोंगरेमराठीत वेगवेगळे प्रयोग करून उत्तम कलाकृती असलेले चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचविले जात आहेत. खरं तर मराठी प्रेक्षक सर्वाधिक प्रगल्भ असून, चांगल्या निर्मितीचे त्यांनी नेहमीच खुल्या दिलाने स्वागत केले आहे, असे मत अभिनेता अमेय वाघ याने व्यक्त केले. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ आणि ‘मुरांबा’ फेम अमेय वाघ ‘फास्टर फेणे’मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाबद्दल त्याच्याशी संवाद साधला असता, त्याने दिलखुलासपणे ‘फास्टर फेणे’चा प्रवास सांगितला. प्रश्न : ‘फास्टर फेणे’बद्दल काय सांगशील?- गेल्या दोन वर्षांपासून मी या प्रोजेक्टशी जुळलो आहे. करिअरमधील जेव्हा एवढा काळ एखाद्या प्रोजेक्टवर घालविला जातो, तेव्हा मनात धाकधूक निर्माण होणे स्वाभाविक आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिका संपल्यानंतर मला जवळपास १५ ते १६ चित्रपटांच्या आॅफर्स आल्या. परंतु मी यातून ‘फास्टर फेणे’ची निवड केली. कारण मला असे वाटत होते की, इतर प्रोजेक्टच्या तुलनेत ‘फास्टर फेणे’ एक जबाबदारीचे काम आहे. यासाठी मी दहा ते बारा किलो वजन कमी केले. चित्रपटात अ‍ॅक्शन स्टंट असल्याने त्याकरिता स्पेशल ट्रेनिंगही घेतली. आता या सगळ्याला दृश्य स्वरूप येत असल्याने मी आनंदी आहे. शिवाय ज्या पद्धतीने लोकांच्या प्रतिक्रिया मिळत आहेत, त्यावरून माझ्या आयुष्यातील एका पर्वाला पूर्णरूप मिळत असल्याचे मला वाटत आहे. प्रश्न : चॉकलेट अभिनेता म्हणून तुझी इमेज आहे, अशात तू या चित्रपटात बरेचसे अ‍ॅक्शन स्टंट केले आहेत. ही इमेज बदलली जाईल अशी तुला भीती वाटली नाही काय?- मी या गोष्टीचा कधीच विचार करीत नाही. कारण माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की, विविध प्रकारच्या भूमिका आपण साकारायला हव्यात. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून मी घराघरांत पोहोचलो. पुढे ‘कास्टिंग काउच’ नावाची वेबसिरीज केली. या दोघांची जर तुलना केली तर मी दोन्हींमध्ये विभिन्न स्वरूपाच्या भूमिका साकारल्या. ‘अमर स्टुडिओ’ नावाच्या नाटकात मी तीन वेगवेगळ्या स्वरूपाच्या भूमिका केल्या. त्यामुळे मला असे वाटते की, लेखक आणि दिग्दर्शकांनी त्यांना अपेक्षित असलेल्या रूपात बघण्यासाठी आपण विभिन्न स्वरूपाच्या भूमिका साकारायला हव्यात. त्याही पलीकडे एका कलाकारांनी कुठल्याही भूमिकेकडे संधी म्हणून बघायला हवे, असे मला वाटते.प्रश्न : दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा सांगशील. - या दिग्गज कलाकारांसोबत काम करताना मला खूपच मजा आली. गिरीश कुलकर्णी यांच्यासोबत मी ‘एक दिवस मठाकडे’ या नाटकात काम केले आहे. हे नाटक सतीश आलेकर यांनी लिहिले. माझ्या आयुष्यातील पहिल्या सिनेमातील पहिला शॉट मी दिलीप काकांबरोबर दिला आहे. या चित्रपटात मी त्यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. वास्तविक हे दोन्ही दिग्गज माझे सुरुवातीपासूनच फेव्हरेट कलाकार आहेत. ‘फास्टर फेणे’मध्ये करताना त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले आहे. प्रश्न : निर्माता रितेश देशमुख याने व्यक्तिगतपणे या चित्रपटात लक्ष घातले होते, त्याच्यासोबतचा अनुभव कसा सांगशील? - मला असे वाटते की आजच्या स्थितीत एखादा चांगला चित्रपट करून उपयोग नाही. कारण तो चित्रपट जर उत्तमरीत्या लोकांपर्यंत पोहोचलाच नाही तर त्याला काही अर्थ उरत नाही. रितेश देशमुख यांनी हा चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम अतिशय खुबीने केले आहे. आदित्य सरपोतदार यांनी चांगल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करून जेवढे मोलाचे काम केले आहे, तेवढेच मोलाचे काम रितेश देशमुख याने केले आहे. खरं तर रितेशने चित्रपटाच्या कास्टिंगपासून ते कथेपर्यंत स्वत:हून लक्ष दिले आहे. त्याच्यासारख्या मोठ्या कलाकाराने माझ्यासारख्या एका नटावर ऐवढी मोठी जबाबदारी टाकणे हे माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे. प्रश्न : सध्या प्रेक्षकांना मसालापट भावत आहेत, मात्र मराठीत हा ट्रेण्ड अजून आला नाही, काय सांगशील?- होय, मराठी प्रेक्षक आजही कौटुंबिक चित्रपट बघणे पसंत करतात. कारण अजूनही तरूणांशी निगडीत म्हणावे तशा चित्रपटाची मराठी निर्मिती केली जात नाही. ‘मुरंबा’ हा चित्रपट तरुणांशी निगडीत होता, परंतु तो कौटुंबिकही होता. ‘फास्टर फेणे’ हादेखील एका कौटुंबिक चित्रपट नाही. परंतु अख्ख्या कुटुंबाला आवडेलहेदेखील तेवढेच खरे आहे. माझ्या मते हा चित्रपट मराठीतील नवीन जॉनर आहे. खरं तर मराठी प्रेक्षक खूपच प्रगल्भ आहे. त्यामुळे वेगवेगळे प्रयोग करून उत्तम कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचविल्यास ते त्याचे खुल्या दिलाने स्वागत करतील हेही तेवढेच खरे आहे. प्रश्न : तू आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे, लग्नानंतर हा तुझा रिलीज होणारा पहिलाच चित्रपट असल्याने याविषयी तू कितपत उत्सुक आहेस? - साजरीबरोबर जेव्हा माझे लग्न ठरले तेव्हा ‘मुरंबा’ हिट झाला. आता लग्न झाले आणि लग्नानंतर माझा चित्रपट रिलीज होत आहे. गेल्या तेरा वर्षांपासून आमच्यात मैत्री होती. त्यामुळे तेव्हापासून मला तिचा पाठिंबा मिळत आहे. खरं तर मी तिला माझी सर्वांत मोठी समीक्षक समजतो. कारण ती पटकन माझ्या कुठल्याही कामावर खूश होत नाही. अगोदर ती ते काम खोडून काढते, त्यानंतरच त्यावर प्रतिक्रिया देते. आज मी तिला चित्रपट दाखविणार आहे. त्यावर तिचे मत जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. कारण इतरांचे मत एका बाजूला अन् बायकोचे मत एका बाजूला असे मी समजतो. तुझ्या आगामी प्रोजेक्टबद्दल काय सांगतो. - सध्या माझ्याकडे कुुठलाच चित्रपट नाही. मी चांगल्या स्क्रिप्टच्या प्रतीक्षेत आहे. आगामी काळात ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाचे आम्हाला महाराष्टÑाभर प्रयोग करायचे आहेत. या अगोदर या नाटकाचे पुणे, मुंबई येथे प्रयोग झाले आहेत.