Join us  

असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता! तेजस्विनी पंडितचं संतप्त ट्वीट, म्हणाली, "सर्रास गोळीबार, खून, ड्रग्ज..."

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 8:37 AM

तेजस्विनीने टोल मुद्दा आणि राज्यातील राजकारणावर ट्वीटमधून तिची नाराजी व्यक्त केली होती. आता राज्यातील गुन्हेगारीवर तेजस्विनीने तिचं परखड मत मांडलं आहे. 

तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम करून तिने स्वत:चं स्थान निर्माण केलं. अभिनय आणि सौंदर्याबरोबरच तेजस्विनी तिच्या बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. समाजातील अनेक घडामोडींवर तेजस्विनी बिनधास्तपणे तिचं मत व्यक्त करताना दिसते. याआधी तिने टोल मुद्दा आणि राज्यातील राजकारणावर ट्वीटमधून तिची नाराजी व्यक्त केली होती. आता राज्यातील गुन्हेगारीवर तेजस्विनीने तिचं परखड मत मांडलं आहे. 

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात राजकीय नेत्यांवर गोळीबार आणि हत्येच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यात तब्बल १८३७ कोटींचे ड्रग्जही जप्त करण्यात आले. त्यानंतर पुण्यातील टेकडीवर मध्यधुंद अवस्थेत असलेल्या मुलींचा व्हिडिओ अभिनेता रमेश परदेशी यांनी शेअर करत शहरातील गंभीर परिस्थितीवर भाष्य केलं होतं. आता याबाबत तेजस्विनीने ट्वीटमधून संताप व्यक्त केला आहे. दुष्काळ, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न वर्षानुवर्ष सतावत आहेतच...आता सर्रास गोळीबार, खून, ड्रग्ज...? असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता", असं तेजस्विनीने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

तेजस्विनीचं हे ट्वीट प्रचंड व्हायरल झालं असून त्यावर लोकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. दरम्यान, तेजस्विनी अलिकडेच प्रदर्शित झालेल्या एकदा येऊन तर बघा या सिनेमात दिसली होती. रानबाजार, समांतर, अनुराधा या वेब सीरिजमध्येही तिने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. 

टॅग्स :तेजस्विनी पंडितअमली पदार्थसेलिब्रिटी