Join us  

सिनेइंडस्ट्रीत पूर्ण वेळ कार्यरत राहण्यासाठी 'ह्या' अभिनेत्रीने सोडली बँकेतील नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 1:59 PM

बँकेतील जबाबदारी सांभाळत या मराठी अभिनेत्रीने 'बबन' या मराठी चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

जुनी सांगवी येथील एका राष्ट्रीय बँकेच्या शाखा व्यपस्थापकपदी कार्यरत असताना अभिनेत्री सीमा समर्थ यांनी बँकेतील जबाबदारी सांभाळत अभिनय कलेच्या माध्यमातून 'बबन' या मराठी चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी खेडे गावातील आजीची भूमिका केली होती. त्यांच्या या भूमिकेचे सर्वत्र खूप कौतूक झाले. त्यानंतर आता त्या 'हैदराबाद कस्टडी' या चित्रपटातही काम करताना दिसणार आहेत आणि आता त्यांनी पूर्ण वेळ अभिनय क्षेत्रात कार्यरत राहण्यासाठी बँकेच्या नोकरीला देखील रामराम केला आहे. 

'बबन' चित्रपटातून सीमा समर्थ यांच्या अभिनय कौशल्याला वाव मिळाली. देर से ही सही, दुरुस्त आए म्हणत त्यांनी आता बँकेतील नोकरी सोडली आहे आणि त्या पूर्ण वेळ अभिनय क्षेत्रात काम करणार आहेत.

त्यांच्या अभिनयाच्या आवडीबद्दल त्या सांगतात की, 'अभिनय ही माझी पहिली आवड आहे. मात्र मी १९८१ सालापासून बँकेत कार्यरत होते. सुरूवातीला आकाशवाणी, दूरदर्शनवर छोटी मोठी कामे केली आहेत. मात्र चित्रपटात काम करण्याची संधी मला बबन चित्रपटातून मिळाली. बँकिंग क्षेत्रातील करियरमधून रिटायर होण्याच्या मार्गावर असताना भाऊराव कऱ्हाडे यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी दिली. आता त्यांच्या 'बबन' चित्रपटानंतर पुन्हा एकदा मी त्यांच्या 'हैदराबाद कस्टडी' चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला मेमध्ये सुरूवात होणार आहे. '

पुढे त्या म्हणाल्या की,' याशिवाय सध्या आणखीन एका सिनेमाची बोलणी सुरू आहे. त्याबद्दल बोलणे आता उचित ठरणार नाही.  तसेच मी टेलिव्हिजनवरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. चांगल्या भूमिकेच्या सध्या शोधात आहे.'

'हैद्राबाद कस्टडी' हा चित्रपट गुन्हेगार आणि पोलिस यांच्यावर आधारीत असून लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे.

टॅग्स :भाऊराव क-हाडे