कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाःकार माजवला आहे. ऑक्सिजन, बेड्स आणि वैद्यकीय सेवा-सुविधांसाठी लोक रस्त्यावर वणवण करत आहेत. अशातच, आता अभिनेता बनलेला डॉक्टर आशिष गोखले याने भारतीयांसाठी अत्यंत महत्वाचा संदेश दिला आहे. सध्याच्या संकट काळात शांत राहून परिस्थितीचा सामना करण्यातच शहाणपण असल्याचे सांगत मोगरा फुलला फेम आशिष गोखले याने परिस्थितीजन्य तणावाचा माणसाच्या मनावर आणि शरिरावरही कसा विपरित परिणाम होतो, हे स्पष्ट केले आहे.
देशाने कोरोनाविरुद्धचे युद्ध सुरू केल्यावर मूळचा डॉक्टर असलेला हा अभिनेता पुन्हा एकदा त्याच्या डॉक्टरकीकडे वळला आणि त्याने त्याचा पूर्ण वेळ आजारी रुग्णांची सेवा करण्यासाठी दिला. आशिष गोखले म्हणाला की, तुम्ही वॉक घेण्यासाठी बाहेर पडला आहात आणि अचानक काही कुत्रे तुमच्यावर भुंकायला लागले, तुम्ही घाबरलात, असा विचार करा. तुमचा मेंदू त्वरित ही भीती ओळखतो आणि हायपोथॅलॅमस या ग्रंथीला कॉर्टिकोट्रोपिन-रिलिझिंग संप्रेरक (सीआरएच) स्त्रवण्याचा इशारा देतो. त्यानंतर सीआरएच तुमच्या पियुषिका ग्रंथींना अड्रीनोकॉर्टिकोट्रॉपिक संप्रेरकाचा (एसीटीएच) स्त्राव करण्याची आज्ञा देते, परिणामी अड्रीनॅलिन ग्रंथी कॉर्टिसोल हे संप्रेरक उत्पादित करतात, त्यालाच तणावाचे संप्रेरक किंव स्ट्रेस हार्मोन असे म्हणतात. अशा वेळी अड्रीनॅलिन ग्रंथी अड्रीनॅलिन आणि कॉर्टीसोल आपल्या रक्तातील पेशींमध्ये सोडते. अड्रीनॅलिनमुळे आपल्या ह्रदयगतीवर परिणाम होतो, परिणामी छातीत धडधडणे, रक्तदाब वाढणे अशा समस्या उद्भवतात. कॉर्टीसोलमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि रक्तवाहिन्या अरुंद होतात. कालांतराने, डोपामाईन, ऑक्सिटोसिन आणि एण्डॉर्फिन्स ही हॅप्पी हार्मोन्स असंतुलित होतात.