Join us  

Amey Wagh, Sumeet Raghvan : तू राघू.. तू सर्कशीतला वाघ.. FBवर रंगला शाब्दिक वाद; पण 'मॅटर' वेगळंच निघालं!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 4:51 PM

Amey Wagh And Sumeet Raghvan :गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर अमेय वाघ आणि सुमीत राघवन या दोन कलाकारांमध्ये चांगलीच जुंपली होती. फेसबुकवरून दोघांनी एकमेकांना डिवचणाऱ्या पोस्ट टाकून सगळ्यांना हैराण केलं होतं...

गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर अमेय वाघ (Amey Wagh) आणि सुमीत राघवन (Sumeet Raghvan) या दोन कलाकारांमध्ये चांगलीच जुंपली होती. फेसबुकवरून दोघांनी एकमेकांना डिवचणाऱ्या पोस्ट टाकून सगळ्यांना हैराण केलं होतं. ‘जंगलात राघू खूप असतात पण वाघ मात्र एकच असतो....याची कृपया नोंद घ्यावी’, अशी एक पोस्ट अमेयने शेअर केली होती आणि खास म्हणजे यात त्याने सुमीतला टॅग केलं होतं.  अमेयच्या या पोस्टला सुमीतनेही जशात तसं उत्तर दिलं होतं. ‘सर्कशीतल्या वाघाचा फार त्रागा होतोय असं वाटतंय.... कसं ना फक्त आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही, याचीही कृपया नोंद घ्यावी...,’ असं प्रत्युत्तर सुमीतने दिलं होतं. यानंतर दोघांमध्येही चांगलचं ‘फेसबुक वॉर’ रंगलं होतं.

अमेय व सुमीत कशावरून भांडताहेत, नेमकं दोघांमध्ये काय बिनसलं? हे कळायला मात्र मार्ग नव्हता. पण चला, आता त्याचाही खुलासा झाला आहे. तर या लुटूपुट भांडणाचं कारण होतं ‘झी मराठी  अवार्ड  2022.होय, लवकरच झी मराठी पुरस्कार सोहळा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि या सोहळ्यात अमेय व सुमीत ही जोडी आमनेसामने येणार आहे. होय, अमेय आणि सुमीत हे दोघे हा सोहळा होस्ट करणार आहेत.

आता अवार्ड शो होस्ट करणार म्हटल्यानंतर त्याला तडका हवाच. तर फेसबुकवरचं भांडण नेमकं याचसाठी होतं. अवार्ड शो होस्ट करतानाची लुटूपुटू भांडणं पाहताना मज्जा येते. फेसबुकवर अमेय व सुमीतने याचीच झलक दाखवली.एकंदर काय तर अमेय व सुमीत यांचं भांडण हा प्रमोशनचा फंडा होता. अलीकडे सोशल मीडियावरून अशा प्रमोशनचा ट्रेंड वाढला आहे. झी मराठी अवार्डच्या प्रमोशनसाठी अमेय व सुमीतने हाच फंडा वापरला इतकंच.

टॅग्स :अमेय वाघसुमीत राघवनझी मराठी अवॉर्ड्स २०१८मराठी अभिनेता