Join us  

शिष्यवृत्ती सिनेमाचा मुहूर्त संपन्न, हे कलाकार झळकणार मुख्य भूमिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 2:15 PM

शिष्यवृत्ती सिनेमा म्हणजे एका विद्यार्थी आणि शिक्षकाची भावस्पर्शी अशी गोष्ट आहे, जिचा शेवट वेगळ्या वाटेने सकारात्मक पद्धतीने होतो.

दिवसेंदिवस सिनेमांमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. नवनवीन गोष्टींमुळे सिनेमा अधिकाधिक रसिकांना आकर्षित करण्यात यशस्वी होत आहेत. विशेषतः मराठी सिनेमा प्रगल्भ होत आहे. मराठी सिनेमात निरनिराळ्या गोष्टी दिग्दर्शकांकडून आजमावल्या जात आहेत. असाच एक आगळा वेगळा विषयावर आधारित एक मराठी सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. ओ थ्री शॉपिंग निर्मितीसंस्थे अंतर्गत अनिल बेहेरे, वीनया गोझर, सुभाष मांडवकर निर्मित, साज एन्टरटेनमेंट सहनिर्मित, अखिल देसाई दिग्दर्शित शिष्यवृत्ती या मराठी सिनेमाचा मुहूर्त नुकताच ओ थ्री शॉपिंगच्या ठाणे येथील कार्यालयात सिनेमातील एक दृश्य चित्रित करून करण्यात आला.

यावेळी सिनेमातील कलाकार दुष्यंत वाघ, रेश्मा, कमलेश सावंत, अनिकेत केळकर, उदय सबनीस, अंशुमन विचारे, रुद्र ढोरे, प्रशांत नागरे, दीपक भागवत उपस्थित होते. अलीकडेच दिग्दर्शक अखिल देसाई यांचा मोर्चा नावाचा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला होता, शिष्यवृत्ती या सिनेमाबद्दल देसाई सांगतात कि, खरंतर या विषयाची सुरुवात माझ्या शाळेपासून झाली आहे. मी शाळेत शिकत असतांना अशा काही घटना घडल्या होत्या, ज्या आजही माझ्या मनात घर करून आहेत. त्यावर सिनेमा करायचे हे आधीपासूनच माझे स्वप्न होते. पण चित्रपटाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थिक पाठबळ लागतं जे माझे मित्र अनिल बेहेरे यांनी निर्माता म्हणून दिले. शिष्यवृत्ती सिनेमा म्हणजे एका विद्यार्थी आणि शिक्षकाची भावस्पर्शी अशी गोष्ट आहे, जिचा शेवट वेगळ्या वाटेने सकारात्मक पद्धतीने होतो.

अखिल देसाई पुढे सांगतात कि, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या सिनेमाचे चित्रीकरण शहापूर आणि दापोली या भागात करण्यात येणार आहे. सिनेमाची कथा, पटकथा माझी असून, सवांद स्वप्नील सारंग यांचे आहे तर गीतकार विनोद पितळे, दिनकर खाडे, बाळासाहेब लबडे, चंद्रशेखर तेली. संगीत भरत सिंग. छायांकन अजित सिंग. संकलन नुरेन अन्सारी. वेशभूषा चैत्राली डोंगरे यांची आहे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असं म्हणत असतांना मिळालेली शिष्यवृत्ती नाकारून स्वतःच्या गुणवत्तेच्या बळावर पुढे जाणाऱ्या मुलाची ही धाडसी गोष्ट आहे. आजच्या मुलांसाठी प्रेरणादायी असा हा सिनेमा असणार आहे.