Join us  

जुगारासाठी रवींद्र महाजनी यांनी विकल्या होत्या बायकोच्या बांगड्या; माधवी यांचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 4:16 PM

Madhavi mahajani: 'रवीसोबत मी लग्न करु नये', असा सल्ला खुद्द अभिनेत्याच्या आईने माधवी यांना दिला होता.

मराठी कलाविश्वातील देखणा नट म्हणून कायम रवींद्र महाजनी (ravindra mahajani) यांच्याकडे पाहिलं जायचं. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रवींद्र महाजनी यांच्या अकस्मित झालेल्या निधनामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. परंतु, सध्या त्यांच्याविषयी समोर येत असलेल्या माहितीमुळे अनेक जण आश्चर्यचकित होत आहेत. अलिकडेच रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी महाजनी यांचा चौथा अंक हे आत्मचरित्र प्रकाशित झालं. या पुस्तकात त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यामध्येच रवींद्र महाजनी यांना जुगाराची वाईट सवय होती असं त्यांनी नमूद केलं आहे.

२९ जानेवारी रोजी माधवी महाजनी यांचं चौथा अंक हे आत्मचरित्र प्रकाशित करण्यात आलं. यावेळी गश्मीरने या पुस्तकाची प्रस्तावना वाचून दाखवली. यात माधवी यांनी रवींद्र महाजनी यांच्यासोबतचा संसार कसा होता, त्यांचं नात कसं होतं या सगळ्यावर उघडपणे भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे या पुस्तकात त्यांनी रवींद्र महाजनी आणि त्यांची लव्हस्टोरी सुद्धा सांगितली. परंतु, जुगाराच्या व्यसनापायी त्यांनी चक्क माधवी यांच्या सोन्याच्या सहा बांगड्या विकल्या होत्या हे सुद्धा सांगितलं.

माधवी-रवींद्र महाजनींचं होतं लव्ह मॅरेज

माधवी यांनी घरातल्यांचा विरोध झुगारुन रवींद्र महाजनी यांच्यासोबत लग्न केलं होतं. विशेष म्हणजे त्यांच्या बहिणीचा तर कडवा विरोध होता. लग्नापूर्वी माधवी यांनी रवींद्र यांची प्रत्येक बाजू सावरुन घेतली होती. मात्र, लग्नानंतर सुद्धा त्यांच्या वागण्यात काहीच बदल झाला नव्हता.

रवींद्र महाजनींना होतं जुगाराचं व्यसन

माधवी यांनी त्यांच्या पुस्तकात रवींद्र यांना जुगाराचं व्यसन होतं असं लिहिलं आहे. एकदा तर जुगारासाठी त्यांनी चक्क माधवी यांच्या हातातील ६ सोन्याच्या बांगड्या विकल्या. परिणाम, पहिल्यांदाच माधवी त्यांच्या आईशी खोटं बोलल्या होत्या. 'एकदा मी कॉलेजमधून येत असताना रवी अचानक पुढ्यात आला. उदास चेहरा करत त्याने जुगारात सगळे पैसे हरल्याचं सांगितलं. हे पैसे त्याला वडिलांनी कॉम्प्युटर क्लासची फी भरण्यासाठी दिले होते. त्यामुळे जर सत्य घरी कळलं तर दादा घरात घेणार नाहीत, हकलून देतील असं त्यांनी सांगितलं. त्यांचं हे बोलणं ऐकून माधवी यांनी भरुन आलं आणि कशाचाही विचार न करता त्यांनी हातातील सोन्याच्या बांगड्या रवींद्र यांना दिल्या.

सोन्याच्या बांगड्या विकून खेळला जुगार

माधवी घरी गेल्यानंतर त्यांचा रिकामा हात पाहून त्यांच्या आईने बांगड्या कुठे गेल्या असं विचारलं. त्यावर, पहिल्यांदाच त्या खोट बोललं. गाडीमध्ये गर्दी असल्यामुळे कोणी तरी  हातातून ओरबाडून घेतल्या असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रवींद्र यांचा मित्र माधवी यांना भेटला आणि, 'तू काल त्याला पैसे दिलेस का?' असं विचारलं. त्यावर त्यांनी चपापून 'का? असं म्हटलं.' यावर त्या मित्राने दिलेलं उत्तर थक्क करणारं होतं.

रात्रभर खेळत राहिले जुगार

'काल तो रात्रभर जुगाराच्या अड्ड्यावर होता आणि सगळा जुगार तो हरला, असं उत्तर त्याच्या मित्राने दिलं. त्यानंतर मी रवीला भेटले आणि जाब विचारला. त्यावर पुन्हा त्याने निरागस चेहरा करुन 'आधीचे पैसे मिळवण्यासाठी मी तू दिलेल्या बांगड्या मोडून त्या पैशानं काल रात्रभर जुगार खेळलो, पण सगळेच पैसे हरलो', असं उत्तर दिलं.

दरम्यान, मी रवीसोबत लग्न करु नये असं माझ्या मैत्रिणी सुद्धा सांगत होत्या. इतकंच कशाला रवीच्या आईने सुद्धा त्याच्याशी लग्न करु नकोस. त्याच्या सवयी चांगल्या नाहीत. आम्ही दोन वेळा त्याला घरातून हकलून दिलंय. त्यामुळे तुझ्यासाठी वाटलं तर मी दुसरा मुलगा पाहीन, असं सांगितलं होतं. मात्र, मी कोणाचंही ऐकलं नाही आणि लग्न केलं, असं त्या म्हणतात.

टॅग्स :रविंद्र महाजनीगश्मिर महाजनीसेलिब्रिटीमराठी अभिनेता