Join us  

'माहवारी' वेबसीरिजमध्ये बेघर, निरपराध स्मृतीहीन महिलेची कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 2:24 PM

मासिक पाळीवर भाष्य करणाऱ्या 'माहवारी' या वेबसीरिजला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या वेबसीरिजच्या आगामी भागात बेघर, निरपराध स्मृतीहीन महिलेची कथा पाहायला मिळणार आहे.

ठळक मुद्दे'माहवारी' या वेबसीरिजला रसिकांचा मिळतोय चांगला प्रतिसादमाणुसकी जिवंत असल्याचा अनुभव घेतला - वैशाली साळवी-भोसले

मासिक पाळीवर भाष्य करणाऱ्या 'माहवारी' या वेबसीरिजला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या वेबसीरिजच्या आगामी भागात बेघर, निरपराध स्मृतीहीन महिलेची कथा पाहायला मिळणार आहे. या महिलेच्या भूमिकेत अभिनेत्री वैशाली साळवी -भोसले दिसणार आहे. या वेबसीरिजची निर्मिती मोरया प्रोडक्शन आणि अंशुल प्रोडक्शन करत असून दिग्दर्शन अभिनेत्री अश्विनी महांगडे करते आहे.

प्रत्येक कलाकार अशा एखाद्या भूमिकेच्या प्रतिक्षेत असतो, ज्यात त्याला मनसोक्त जगता येईल. अशी संधी मला माहवारी या वेबसीरिजच्या निमित्ताने मिळाली.  माझी जवळची मैत्रीण अश्विनी महांगडे या सीरिजची निर्माती आणि दिग्दर्शिका आहे. सहज गप्पा मारता मारता तिने मला या भूमिकेसाठी विचारले. खरंतर ऐकताच क्षणी ही भूमिका मी करावी असे मनात आले. कारण ही भूमिका मला चॅलेजिंग वाटली आणि हक्काची मैत्रिण दिग्दर्शन करते आहे म्हटल्यावर चर्चा करून दोघांच्या मनासारखे काम करता येईल,या विचाराने मी पाचव्या मिनिटाला तिला हो म्हटले, असे वैशाली सांगत होती. या भागाचे चित्रीकरण वाईत झाले आहे. या चित्रीकरणाच्या अनुभवाबाबत सांगताना वैशाली साळवी-भोसले म्हणाली की,  रिअल लोकेशनवर कॅमेरा लपवून हे शूट करत होतो. नेहमीप्रमाणे विंगेत एन्ट्रीला उभे असताना अॅक्शन म्हणायच्या दोन सेकंदाआधी जसा पोटात गोळा येतो. तसाच यावेळीही वाईच्या त्या एसटी स्टँडवर पाऊल ठेवताच आला. मी खरेच वेडी झाले होते. मूळची मुंबईचीच असल्याने वाईचा हा एसटी स्टँड अगदीच अनोळखी होता. या वेब सीरिजची लेखिका भाग्यशाली राऊत  काही अंतरावरून मला मार्गदर्शन करत होती. गोष्ट माहीत असते तेव्हा नेमके काय करायचे ते ठरवता येते पण जेव्हा प्रेक्षकच सहकलाकार असतो तेव्हा नाट्य आपोआप घडत जाते. तसाच अनुभव होता हा. एक तरुण मुलगी अशा अवस्थेत फिरते आहे. हिला आपली मासिक पाळी सुरु झाली आहे, याचेही भान नाही. कुणी हळहळ व्यक्त करत होते तर कुणी जवळ येऊन चौकशी करत होते. हिच्यावर बलात्कार तर झाला नाही ना अशी शंका काहींच्या मनात येत होती. खरंतर त्यांच्या या अशा प्रश्नांनीच माझ्यातली ती वेडी तयार होत होती. जर खरंच माझ्यावर अशी वेळ आली तर काय होईल या विचारानेच मला सुन्न करून टाकले होते,  अशातच असे एक जिवंत उदाहरण समोर आले.या चित्रीकरणादरम्यान अशा अनुभवातून गेलेली एक बाई तिथे भेटली. तिच्याबाबतीत या कथेप्रमाणे घडल्याचे तिने सांगितले. जेव्हा मी वेडी नसून शुट करतो आहे हे ऐकल्यावर तिला हायसे वाटले. त्या म्हणाल्या की,'बाई तू आज हे जे काही केले आहेस मला माझे ते दिवस आठवले. खरेच वेडी आहेस तू पण कुणावर अशी वेळ येऊ नये', या शब्दांत जणू त्यांनी आम्हाला पोचपावती दिली होती. जातपात, लहानमोठा यापलिकडे माणुसकी जिवंत आहे याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही या माहवारीच्या निमित्ताने घेतल्याचे वैशालीने सांगितले. 'माहवारी' वेब सीरिजचा आगामी भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.