झाडाचं, कोणी पान जरी तोडलं तरी मनातून खट्टू होणारा पिट्या म्हणजे रमेश परदेशी निसर्ग, पर्यावरणाचा समतोल वगैरें गोष्टींसाठी खूप संवेदनशील आहे. ओसाड पडलेल्या टेकड्या पर्यायानं पडलेला दुष्काळ त्याला अंतर्मुख करतो. ‘रेगे’, ‘देऊळ बंद’, ‘दृश्यम’ या चित्रपटांमध्ये झळकलेला कलाकार रमेश परदेशीने त्याच्या वाढदिवस अनोखी पध्दतीने साजरा केला.
रमेश परदेशीने ९ जूनला त्याच्या ४० व्या वाढदिवसाच्या दिवशी कोथरूड मधील ARAI च्या म्हणजे ‘वेताळ टेकडीवर’ जांभूळ, वड, पिंपळ सारखी चाळिस झाडं लावून वाढदिवस साजरा केला. त्याच्यामते, ‘निसर्गानं आपल्याला भरभरून दिलं आहे आणि आता त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे.’
रमेशला या उपक्रमात कुटुंबियासह कलाकार मित्र प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, देवेंद्र गायकवाड, सुनील अभ्यंकर, ऋषिकेश देशपांडे, सिद्धी कुलकर्णी, विनोद वनवे, अमोल धावडे, गौरव भेलके, सुरेश विश्वकर्मा यांनी साथ दिली. त्याच्या ह्या उपक्रमाला, महानगर पालिकेच्या 'वृक्ष संवर्धन समितीच्या' कर्मचाऱ्यांचे देखील सहकार्य असणार आहे.
रमेश लवकरच 'अग्नी' ह्या हिंदी चित्रपटात आणि 'मुळशी डॉट कॉम' व 'फर्स्ट मे' ह्या मराठी चित्रपटात तो त्याच्या दमदार अभिनयाने आपल्याला भेटणार आहे.अभिनय क्षेत्रासाठी आणि पर्यावरणाच्या समतोलासाठी रमेशनं दिलेल्या योगदानाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा !