Join us  

किशोर नांदलस्कर यांच्या निधनानंतर त्यांच्या वाढदिवस सेलिब्रेशनचा व्हिडिओ होतोय व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:45 PM

या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला ते प्रचंड खूश असून नाचताना, गाताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ पाहून नेटिझन्सचे डोळे पाणावत आहेत.

ठळक मुद्देकिशोर नांदलस्कर यांच्या निधनाचा धक्का मराठी चित्रपटसृष्टीसोबतच त्यांच्या चाहत्यांना देखील बसला आहे.

किशोर नांदलस्कर यांनी मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचे परवा ठाणे येथे कोरोनाने निधन झाले. किशोर नांदलस्कर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना ठाण्यातील बाळकुम परिसरातील ग्लोबल कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. पण त्यांची प्राणज्योत मालवली.

किशोर नांदलस्कर यांच्या निधनाचा धक्का मराठी चित्रपटसृष्टीसोबतच त्यांच्या चाहत्यांना देखील बसला आहे. बॉलिवूडमधील देखील अनेक मंडळींनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांचा आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्यांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू असल्याचे आपल्याला दिसत आहे. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला ते प्रचंड खूश असून नाचताना, गाताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ पाहून नेटिझन्सचे डोळे पाणावत आहेत. या वयात देखील त्यांच्यात असलेली एनर्जी, तितकाच मिश्कीलपणा या व्हिडिओत आपल्याला पाहायला मिळत आहे. एक चांगला अभिनेताच नव्हे तर एक चांगला माणूस कोरोनामुळे आम्ही गमावला अशी लोक सोशल मीडियावर कमेंट करत आहेत.

किशोर नांदलस्कर यांनी सुमारे ४० नाटके, २५ हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट आणि २० हून अधिक मालिकांमधून काम केले. ‘नाना करते प्यार’, ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ अशा अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या. ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ आदी नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांचा बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला. ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’, प्राण जाए पर शान न जाए या हिंदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका देखील गाजल्या.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या