Join us  

बैठ्या चाळीतला हा चिमुकला आता बनला मराठीतला पहिला ॲक्शन-डान्सिंग स्टार, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 5:31 PM

गणेश आचार्य या मुलाला म्हणाले की हा दुसरा टायगर श्रॉफ आहे

सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्यच्या हातात असलेला हा चिमुकला स्वत: स्टंट्स - ॲक्शन सीन्स आणि उत्तम डान्स करणारा हिरो बनून चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडले असतील की हा मुलगा नेमका आहे कोण? आणि गणेश आचार्य यांच्याशी त्याचे काय नाते आहे? हा चिमुकला आहे समीर आठल्ये दिग्दर्शित आणि राजकुमार मेंडा निर्मित ८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या मराठीतील पहिल्या भव्य ॲक्शन चित्रपट बकालचा नायक चैतन्य मेस्त्री.

चैतन्य हा मुंबई-सांताक्रुझ येथील प्रभात कॉलनीतील तेली चाळीत एका सामान्य कुटुंबात जन्मलेला नुकताच पदवीधर झालेला एक तरूण आहे. ही तीच सांतांक्रुझ मधील वस्ती आणि चाळ आहे. जिथे सुप्रसिद्ध नृत्य-सिने दिग्दर्शक गणेश आचार्य यांचे बालपण गेले आणि कारकिर्द घडली. गणेश आचार्य यांचा बालपणीचा जिवलग मित्र, सहायक आणि नृत्यदिग्दर्शक दिलीप मेस्त्री यांचा चैतन्य हा मुलगा आहे. दिलीप आणि दीपा हे दोघेही गणेश आचार्य यांच्याकडे डान्सर आणि सहायक म्हणून कार्यरत होते. कालांतराने दिलीप आणि दीपा मेस्त्री हे स्वतंत्र नृत्यदिग्दर्शन करू लागले. पण, गणेश आचार्य यांचे मेस्त्री कुटुंबियांशी आणि प्रभात कॉलनीशी आजही जवळचे संबंध आहेत. चैतन्यसाठी गणेश आचार्य ह्यांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंटवरून प्रसारीत केले आहेत.

याबद्दल गणेश आचार्य म्हणाले की, तेली चाळीत राहत असतानाच मी स्वप्न पाहिलं होतं, की कोरीयोग्राफर बनायचं! आणि ते पूर्ण झालं. तसंच ॲक्शन हिरो बनायचं स्वप्न घेऊन वाढलेला चैतन्य, ज्याला मी लहानपणी अंगाखांद्यावर खेळवलं. ज्याला मी माझा भाचा मानतो. त्याचं ‘बकाल’ या मराठीतील पहिल्या ग्रॅण्ड ॲक्शन फिल्मच्या माध्यमातून स्वप्न पूर्ण होतंय. मला अभिमान आहे की मी ज्या चाळीत-वस्तीत वाढलो आणि आज या स्थानावर आहे. त्याच विभागातला, माझ्या हृदयाच्या जवळ असलेला चैतन्य फिल्म इंडस्ट्रीत एंट्री करतोय. स्वत: सर्व स्टंट्स- ॲक्शन करतोय. मी तर म्हणेन, की हा दुसरा टायगर श्रॉफ आहे.

अशातच दिग्दर्शक समीर आठल्ये यांना त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ॲक्शन फिल्मसाठी एक चपळ नायक हवा होता. त्यांनी परिचित असलेल्या नृत्यदिग्दर्शक दिलीप मेस्त्रींना बोलता बोलता ही गोष्ट सांगितली आणि दिलीप मेस्त्री यांनी मोबाईल मध्ये चित्रीत केलेले चैतन्यचे थरारक आणि अविश्वसनीय कारनामे दाखवले. समीर आठल्येंनी चैतन्यला बोलावून घेलते. ॲक्शन –स्टंट्सचा प्रश्नच नव्हता. पण, त्याला संवाद फेकीचे प्रशिक्षण दिले आणि आज चैतन्य मेस्त्री हा अक्षय कुमार, टायगर श्रॉफ यांच्याप्रमाणे स्वत: स्टंट्स- ॲक्शन करणारा तसेच उत्तम नृत्य करणारा असा मराठीतील पहिला ॲक्शन-डान्सिंग हिरो म्हणून बकालच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे.

चैतन्य सोबत जुई बेंडखळे ही नवोदित अभिनेत्री झळकणार आहे. याशिवाय अशोक समर्थ, अलका कुबल, गणेश यादव, यतीन कारेकर, मिलिंद गवळी, असीत रेडीज, जयंत सावरकर, पुजा नायक हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ऐंशीच्या दशकात विदर्भात घडलेल्या एका सत्यघटनेवर आधरीत असलेला, शिव ओम् व्हीज्युअल्स प्रा. लि. प्रस्तुत मराठीतील पहिला भव्यदिव्य असा थरारक ॲक्शनपट ‘बकाल’ येत्या ८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होत आहे.  

टॅग्स :गणेश आचार्यअलका कुबल