Join us  

देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये 'कानभट्ट' चित्रपटाने मारलीय बाजी, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 7:15 PM

कानभट्ट चित्रपट १९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एखादा सिनेमा देश-विदेशांमधील सिने महोत्सवांमध्ये गाजला की, आपोआप सर्वांचे त्या सिनेमाकडे लक्ष वेधले जाते. मागील काही दिवसांपासून 'कानभट्ट' हा आगामी मराठी सिनेमा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाच्या समजल्या जाणाऱ्या सिने महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवत विविध पुरस्कार आपल्या नावे करत आहे. या सिनेमाने एका मागोमाग एक असे आजवर एकूण १५ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल पुरस्कारांवर आपल्या नावाचा ठसा उमटवण्यात यश मिळवले आहे. कानभट्ट चित्रपट १९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

विविध सिने महोत्सवांमध्ये अभिनयापासून सादरीकरणापर्यंत प्रत्येक गोष्ट बारकाईने न्याहाळत मूल्यमापन करणाऱ्या देश-विदेशातील परीक्षकांनी 'कानभट्ट'च्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. भव्य शिंदे आणि ऋग्वेद मुळे यांची मुख्य भूमिका असलेल्या 'कानभट्ट'ने आतापर्यंत १५ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार आपल्या नावे करत सिनेमाच्या टीमला मिळालेले यश साजरे करण्याची एक संधी दिली आहे. या सिनेमाने आजवर साऊथ फिल्म अँड आर्टस अॅकॅडमी चिले (सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शिका), छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट लेखक), लॅकेसिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शिका), अयोध्या फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट बालचित्रपट), व्हाईट युनिकॅार्न इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट बालचित्रपट), न्यू जर्सी इंडियन अँड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट लेखक), दृक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट बालचित्रपट), आठवा नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट लेखक), व्हर्जिन स्प्रिंग्ज सिनेफेस्ट (सर्वोत्कृष्ट बालचित्रपट), अॅकोलेड ग्लोबल फिल्म कॅाम्पिटीशन (सर्वोत्कृष्ट बालचित्रपट) आणि पोर्ट ब्लेअर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट बालचित्रपट) या सिने महोत्सवांमध्ये विविध पुरस्कार जिंकले आहेत.

देश-विदेशातील सिने महोत्सवांमध्ये बाजी मारल्यानंतर 'कानभट्ट' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. 'कानभट्ट'ला मिळालेले यश पाहता प्रेक्षकांच्या मनातही या सिनेमाबाबत कमालीची उत्सुकता आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून, याला सिनेप्रेमींकडून उदंड प्रतिसाद लाभत आहे. यासोबतच ट्रेलर पाहिल्यानंतर सिनेपरीक्षकही सिनेमाच्या टीमला प्रोत्साहित करत आहेत. या सिनेमाची कथा ऋग्वेद मुळे या लहान मुलाभोवती गुंफण्यात आली असून, त्याची स्वप्न आणि इच्छांभोवती फिरते, जिथे त्याला इतरांचे अनुकरण करण्यास भाग पाडले जाते; परंतु नियतीने त्याच्यासाठी काहीतरी वेगळेच लिहून ठेवलेले असते. 'कानभट्ट'चे कथानक वेद आणि विज्ञान यांच्यातील नातेसंबंध दर्शवणारेही आहे.

१९ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'कानभट्ट'चे दिग्दर्शन अपर्णा एस. होशिंग यांनी केले असून, रॅश प्रॅाडक्शन्सच्या बॅनरखाली निर्मितीही केली आहे. अपर्णा यांचा दिग्दर्शिकेच्या रूपातील हा पहिलाच सिनेमा आहे. याबाबत अपर्णा म्हणाल्या की, दिग्दर्शनाची सुरुवात करण्यासाठी मी मराठी सिनेमा निवडण्यामागे एक विशेष कारण आहे. आज मराठी सिनेसृष्टीला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला असून, याचा फायदा मराठी सिनेमांना होत आहे. मराठी सिनेमांच्या कंटेंटसोबतच कलाकारांच्या अभिनयाकडेही आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुकाने पाहिले जात आहे. मी नेहमीच सिनेमाचा विषय आणि आशयाला प्राधान्य देते. माझ्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या पहिल्या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला असून, प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याची बाब आमच्या संपूर्ण टीमचे मनोधैर्य उंचावणारी आहे.