Join us  

‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटासाठी दोन दिग्गज एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 11:55 AM

‘सविता दामोदर परांजपे’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम आणि अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांची निर्मिती व वितरण करणारे कुमार मंगत पाठक हे दोन दिग्गज मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच एकत्र आले आहेत.

आज मराठी सिनेसृष्टी खऱ्या अर्थाने सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरते आहे. जगभरातील चित्रपट महोत्सवांच्या जोडीला तिकीट खिडकीवरही मराठी सिनेमे चांगली कमाई करण्यात यशस्वी ठरत आहे. याच कारणांमुळे मोठमोठी प्रोडक्शन हाऊसेस मराठीकडे वळत आहेत. या यादीत आता हिंदीतील आणखी दोन नामांकित प्रोडक्शन हाऊसेस आणि त्यासोबतच दोन दिग्गजांची नावं सामील झाली आहेत. ‘सविता दामोदर परांजपे’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम आणि अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांची निर्मिती व वितरण करणारे कुमार मंगत पाठक हे दोन दिग्गज मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच एकत्र आले आहेत.

जॉन अब्राहमच्या ‘जे.ए.एन्टरटेन्मेंट’ने ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाची निर्मिती तर कुमार मंगत पाठक यांच्या ‘पॅनोरमा स्टुडिओज’ने या चित्रपटाची प्रस्तुती आणि वितरणाची जबाबदारी उचलली आहे. ‘जे. ए. एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ या भारतीय सिनेसृष्टीत नावाजल्या जाणाऱ्या दोन मोठ्या निर्मिती संस्था आहेत. या दोन्ही निर्मितीसंस्थांच्या बॅनर्सखालील चित्रपटांना प्रेक्षकांनीही आजवर भरभरून प्रतिसाद दिला आहे. ३१ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘सविता दामोदर परांजपे’च्या निमित्ताने या दोन बड्या कंपन्यांनी पहिल्यांदाच प्रादेशिक चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे.

‘सविता दामोदर परांजपे’ची निर्मिती करण्याबाबत जॉन अब्राहम सांगतात की, मराठीमध्ये नेहमीच चित्रपटाच्या कथेला महत्त्व दिलं जातं. ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकाची कथाही मनाला भावणारी असल्याने त्यावर सिनेमा बनवताना निर्मितीसाठी पुढाकार घेतला. पॅनोरमा स्टुडिओजची साथ लाभल्याने हा प्रवास आणखी सुखकर बनल्याचं जॉनचं म्हणणं आहे. नव्या दृष्टिकोनासह सिनेसृष्टीकडे वळण्याची इच्छा बोलून दाखवतानाच चांगल्या निर्मितीमूल्यांमुळे मराठी चित्रपटांचाही निर्मिती आणि वितरणाचा कॅनव्हास मोठा होईल, असा विश्वास कुमार मंगत पाठक यांनी व्यक्त केला.

पॅनोरमा स्टुडिओने मुरली चटवानी आणि मुनीश सहानी यांच्यासोबत वितरण क्षेत्रातील भागीदारी करत ‘पॅनोरमा स्टुडिओ डिस्ट्रीब्युशन एल.एल.पी’ची स्थापना केली असून ‘पॅन इंडिया डिस्ट्रीब्युशन’ अंतर्गत ‘सविता दामोदर परांजपे’ हा मराठी चित्रपट ते वितरीत करणार आहेत.

सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे या कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. चित्रपटाची कथा शेखर ताम्हाणे यांची असून लेखन, संवाद शिरीष लाटकर यांचे आहेत. योगेंद्र मोगरे, तृप्ती मधुकर तोरडमल सहनिर्माते आहेत. छायांकन प्रसाद भेंडे तर संकलन क्षितिजा खंडागळे यांचे आहे. ३१ ऑगस्टला ‘सविता दामोदर परांजपे’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :जॉन अब्राहम